मुंबई - नायर रूग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधून गुरुवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास एका नवजात बाळाची चोरी झाली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी काही तासांतच याचा तपास करून चोरी झालेल्या बाळाची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी हेजल डोनाल्ड इनस कोरिए (३७) या महिला आरोपीला अटक केली आहे.
नायर रूग्णालयात घडलेल्या घटनेत नायर रुग्णालयातून बाळ चोरी करणाऱ्या महिलेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येऊन बाळ चोरणाऱ्या आरोपी महिलेचा पोलीस शोध घेत होते. तांत्रिक तपास करीत पोलिसांच्या पथकाने काही तासातच मुंबईतील वाकोला परिसरातून ५ दिवसांच्या बाळाला सुखरूप सोडवले आहे. अटक करण्यात आलेली महिला आरोपी ही नालासोपारा पश्चिम येथील राहणारी आहे. बाळाची वैद्यकीय तपासणी करून लवकरच बाळाला त्याच्या पालकांकडे देण्यात येणार आहे.