मुंबई - तुम्ही मास्कचा वापर करत नसाल तर ही तुम्हाला सावध करणारी बातमी आहे. मुंबई पालिकेने मास्कच्या वापराबाबत जनजागृती करूनही मुंबईकर मास्कचा वापर करत नसल्याचे समोर आले आहे. मास्क न घालणाऱ्या एका व्यक्तीने दंड आकारताना हुज्जत घातल्याने गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मास्क न घातल्याने हा पहिल्यांदाच गुन्हा मुंबईत दाखल झाला आहे.
मुंबई महापालिका आयुक्तांनी मास्क न घालणाऱ्यांविरोधात कारवाई कडक करण्याचे निर्देश 24 विभागातील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार पालिकेच्या एम पश्चिम विभागाद्वारे चेंबूर येथे गोवंडी पोलिसांच्या मदतीने मास्क न घालणाऱ्याविरोधात कारवाई सुरू होती.
या कारवाई दरम्यान आचार्य मार्ग येथे बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला मास्क न घातल्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विचारणा केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्या व्यक्तीला गोवंडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. राहुल मधुकर वानखडे (रा. न्यु गौतम नगर गोवंडी) असे या नागरिकाचे नाव आहे. या व्यक्तिविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम 188, 186, 269 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा, म्हणून मास्क न घालणाऱ्यांविरोधात पालिकेने 1 हजार रुपये दंड वसूल केला आहे. मिशन बिगीन अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत असताना हा दंड 200 रुपये इतका कमी करण्यात आला आहे. मात्र मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पालिकेने दंडाची रक्कम 400 रुपये करण्याचा तसेच पोलिसांनाही कारवाईचे अधिकार दिले आहेत.