मुंबई - पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी शाखेने २७ डिसेंबर २०१८ रोजी आतापर्यंतची देशातील सर्वात मोठी कारवाई करत फेंटांनील नावाचे १०० किलोचे अमली पदार्थ जप्त करीत ४ जणांना अटक केली होती. मात्र, या गुन्ह्याची तीव्रता पाहता यात आंतराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांचे रॅकेट समोर आल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी गुजरातच्या एका प्रसिद्ध उद्योगपतीला अटक केली. नटवरलाल मेहता, असे अटक करण्यात आलेल्या उद्योगपतीचे नाव आहे.
मेहता राजकोटच्या सॅम ओ केमिकल कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीने 1-Phenethyl-4 piperidobe Chemical नावाचे रसायन बनवून ४०० किलो रसायन इटली आणि मेक्सिको या ठिकाणी पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे. सलीम ढाला (५२), चांद्रमानी तिवारी (४१) , संदीप तिवारी (३८), धनंजय सरोज (४१), अशी अमली पदार्थाची तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण मुंबईतील कांदिवली आणि नालासोपारा येथे राहणारे आहेत.
काय आहे प्रकरण -
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २७ डिसेंबर २०१८ रोजी फेंटांनील नावाचे १०० किलो अमली पदार्थ जप्त करत ४ जणांना अटक केली होती. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत १ हजार कोटी रुपये होती. हे अमली पदार्थ मुंबईतून मेक्सिको या देशात पाठविण्यात येणार होते, पण मुंबई पोलिसांनी त्या अगोदरच कारवाई करत अमली पदार्थांचे रॅकेट उध्वस्त केले. सुरवातीला हे कच्चे अमली पदार्थ गुजरात मधील सॅम ओ केमिकल कंपनीत पाठविले जाणार होते. या ठिकाणी या अमली पदार्थांवर अधिक प्रक्रिया करुन ४०० किलो पर्यंत अमली पदार्थ बनवून मेक्सिको येथे बनावट कागदपत्रांच्या आधारावर पाठविले जाणार होते. आंतराष्ट्रीय बाजारात या ४०० किलो अमली पदार्थाची किंमत ६ हजार कोटी होणार होती. मात्र, त्या अगोदरच पोलिसांनी कारवाई केली आहे.
काय आहे फेंटांनील
फेंटांनील हे अमली पदार्थ पेनकिलर आणि भूल देण्याच्या औषधांमध्ये वापरले जाते. मात्र, फेंटांनील या अमली पदार्थाचे ०.०१ ग्रॅम सेवन सुद्धा सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते.
फेंटांनील अमली पदार्थ कोकेन पेक्षा ५० टक्के अधिक नशा देते तर मोरफिन या अमली पदार्थांपेक्षा १०० टक्के अधिक नशा देत असल्याने आंतराष्ट्रीय बाजारात याला मोठी मागणी आहे.
भारतात फेंटांनील अमली पदार्थ १२ कोटी प्रतिकिलो या भावाने विकले जाते.