मुंबई - १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत सोशल मीडियावर मैत्री करून तिचे अपहरण करण्यात आले. यानंतर संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी शहर पोलिसांच्या आग्रीपाडा पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अपहरण करण्यासाठी आरोपीस मदत करणाऱ्या चौघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पीडितेची सुटका करून तिला पलकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
१ जुलै रोजी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या आज्जीने नातीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके बनवून सुत्रे हालवण्यास सुरुवात केली. आरोपीने पीडित मुलीला फूस लावून तिचे अपहरण करून वाहनाने मध्य प्रदेशातील राजगड येथे नेले होते. या दरम्यान आरोपीने १३ वर्षांच्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
सोशल मीडियावर झाली ओळख
पीडित मुलीसोबत आरोपीची काही दिवसांपूर्वी सोशल माध्यमावर ओळख झाली होती. सतत संपर्कात राहिल्याने आरोपीने पीडित मुलीचे अपहरण करण्यासाठी त्याच्या ४ मित्रांची मदत घेतली. पीडित मुलीला मध्य प्रदेश येथे अपहरण करून नेण्यासाठी ४ आरोपींनी एका वाहनाची व्यवस्था केली होती.
प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना आरोपी व पीडित मुलीचा शोध लागत नव्हता. मात्र पीडित मुलगी वास्तव्यास असलेल्या परिसरातून एक वाहन मुंबईतून मध्य प्रदेशात जाऊन परत आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी राजस्थानातील झालवाड येथून मदत करणाऱ्या ४ आरोपींना अटक केली. पुढील तपासात मुख्य आरोपी व पीडित मुलगी मध्य प्रदेशात असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पीडित मुलीची सुखरुप सुटका केली असून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.