मुंबई- आर्थिक राजधानी मुंबई शहरात अनाधिकृतपणे शस्त्रास्त्र विक्री प्रकरणात गेल्या 8 महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 10 पिस्तूल, 2 मॅगजीन व 6 जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
दोन फरार एकाला अटक
मुंबई पोलिसांच्या युनिट 7 ला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पूर्व द्रुगती मार्गावरील मिठागर गेट येथे सापळा रचण्यात आला होता. दरम्यान एक व्यक्ती पाठीवर बॅग अडकवून या परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली. याच दरम्यान संबंधित व्यक्तीला भेटण्यासाठी आणखी 2 व्यक्ती घटनास्थळी आल्या. या तिघांमध्ये चर्चा सुरू झाली. पोलिसांनी तिघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत यातील 2 आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र पाठीवर बॅग अडकवलेला आरोपी लाखन सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून 10 पिस्तूल, 2 मॅगजीन व 6 जिवंत काडतुसे असा 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . अटक करण्यात आलेला आरोपी लाखन सिंग हा स्वतः देशी बनावटीची शस्त्र बनवण्यामध्ये तरबेज असून, गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसारख्या शहरांमध्ये तो अनधिकृतपणे या शस्त्रांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान शास्त्रविक्री करणाऱ्या या टोळीत आणखी किती जण सहभागी आहेत याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा -..तर किडनी विकायची परवानगी द्या; पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पंतप्रधांकडे मागणी