मुंबई : सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या ३१ डिसेंबरच्या सुट्ट्या, साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या ( Mumbai Police leave canceled ) आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खलिस्तानी समर्थकांकडून मुंबईला लक्ष्य करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय यंत्रणांकडून मुंबई पोलिसांना हा अलर्ट प्राप्त झाला ( Mumbai Police On High Alert ) आहे.
चोख पोलीस बंदोबस्त
मुंबईच्या गजबजलेल्या भागात 31 डिसेंबर रोजी घातपाताची शक्यता गृहीत धरून पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात येणार आहे. कोरोनामुळे क्रिमिनल प्रोसिजर कोड (CrPC) चे कलम 144 मुंबईत आधीपासूनच लागू करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, पोलिसांच्या आदेशानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल, बार, पब, ऑर्केस्ट्रा, रिसॉर्ट्स, क्लब आणि छतावरील कोणत्याही बंद किंवा मोकळ्या जागेत नवीन वर्षाचे सर्व उत्सव, कार्यक्रम, कार्ये आणि मेळावे घेण्यास मनाई आहे.
गुप्तचर यंत्रणेची माहिती
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईवर खलिस्तानी संघटना दहशतवादी हल्ले करू शकतात, अशी माहिती केंद्रीय गुप्चचर यंत्रणांना मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झाले असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांच्या उद्याच्या साप्ताहिक आणि इतर सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात नववर्षाच्या स्वागताचा करिता लोक बाहेर येत असतात त्यांच्या सुरक्षिततेकरिता मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईवर सतत दहशतवादी हल्ल्याच्या सावट असते. त्याच अनुषंगाने मुंबईत दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी गुप्तचर यंत्रणेला माहिती दिल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाली आहे.
3000 पोलीस तैनात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना मुंबईवर उद्या हल्ला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या उद्या सर्व सुट्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख स्थानकं जसे दादर, वांद्रे, चर्चगेट, सीएसएमटी, कुर्ला आणि इतर स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उद्या 3000 हून अधिक रेल्वे अधिकारी तैनात केले जातील, अशी माहिती मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त क्वेसर खालिद यांनी दिली आहे.