मुंबई - कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे आपापल्या गावी जातात, यामुळे त्यांना हा उत्सव आनंदात साजरा करण्यात यावा यासाठी शालेय शिक्षण विभागाने त्यांचे वेतन गणेशोत्सवाच्या पूर्वी दोन दिवस अगोदर त्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक परिषदेने दोनच दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर तातडीने कार्यवाही झाल्याने राज्यातील सुमारे ५ लाखांहून अधिक शिक्षकांना गणेशोत्सव आनंदात साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली आहे.
शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी शिक्षकांच्या या वेतनासाठी शालेय आणि वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यासाठीचे आदेश दिले. यासाठी गणपती उत्सवासाठी आगाऊ वेतन मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने २३ ऑगस्टला मागणी केली होती. ती आज पूर्ण झाल्याने परिषदेचे आमदार नागो गाणार, कार्यवाह शिवनाथ दराडे, प्रकाश मिश्रा, दिलीप अवारे, बाबा कदम आदींनी शिक्षणमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
शिक्षकांना गणेशोत्सवापूर्वीच त्यांच्या बँक खात्यांवर वेतन जमा करावे, यासाठी वित्त विभागाच्या लेखा व कोषागरे संचालनालयाने राज्यातील अधिदान व लेखा अधिकारी, जिल्हा कोषागार अधिकारी यांचा ऑगस्ट महिन्यातील वेतन हे ३१ ऑगस्टपर्यंत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील 2177 जिल्हा परिषद शाळा पावसामुळे प्रभावित, शिक्षण मंत्री शेलारांची माहिती