मुंबई - पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी पूर आल्याने अनेक दहीहंड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र घाटकोपर येथे आयोजित केलेल्या दहीहंडीमधून प्रत्येक सलामीमागे एक हजार रुपये पूरग्रस्तांना देण्यात आले. भाजप नेते प्रवीण छेडा यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
मुंबईत यावर्षी मोठ्या आयोजकांनी आपल्या दहीहंड्याचे आयोजन केले नसले तरी छोट्या आयोजकांनी मात्र आपल्या हंड्या बांधल्या होत्या. त्यामुळे मोठ्या हंड्या रद्द झाल्याने गोविंदा पथकांनी आपला मोर्चा छोट्या दहीहंड्याकडे वळवला होता. घाटकोपर पश्चिम येथे भारतीय जनता पक्ष आणि महात्मा गांधी मार्ग व्यापारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यावर्षीही दहीहंडीचे आयोजन केले होते.
गोविंदा पथक आणि मदत करणाऱ्यांना व्यासपीठ मिळावे, संस्कृती जपावी यासाठी दहीहंडीचे आयोजन - प्रवीण छेडा
गेले 13 वर्ष दहीहंडीचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी महाराष्ट्रात पूर परिस्थिती असल्याने अनेक मोठ्या दहीहंडी रद्द करण्यात आल्या आहेत. दहीहंडी हा धार्मिक सण आहे. सण साजरा होणे हेही गरजेचे असून त्यामधून पूरग्रस्तांना मदत करता यावी, यासाठी आम्ही प्रत्येक सलामी मागे एक हजार रुपये पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभरात रात्री दहा पर्यंत एक ते दीड लाख रुपये पूरग्रस्तांसाठी जमवले जातील, आणि पूरग्रस्तांना पाठवले जातील असे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी सांगितले.