मुंबई - ऐन पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे व त्या साचलेल्या पाण्यात निर्माण झालेले डास यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही पालिकेने दुर्लक्ष केल्याने आज स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून पालिकेविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.
रस्ता दुरूस्तीसाठी मुंबईकर उतरले रस्त्यावर
रस्ता खासगी असल्याचे कारण देत मालाडच्या पी उत्तर पालिका विभागाने रस्ता दुरुस्ती करण्याची आपली जबाबदारी हटवून हात वर केले आहे. यामुळे मालाडच्या काचपाडा परिसरातील डीमोनेट लेन येथील नागरिक त्रासले आहेत.
मालाडच्या काचपाडा परिसरात गेल्या 15 वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. यामुळे 12 महिने या रस्त्याची अवस्था बिकट असते. पावसाळ्यात तर या रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडतात. त्या खड्ड्यात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव होतोय. यामुळे परिसरात मलेरियासारखे आजार डोकं वर काढण्याची भीती येथील नागरिकांना आहे.