मुंबई - शहर परिसरातील कोरोनाच्या प्रसारामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मार्च ते सप्टेंबरपर्यंत सुमारे ५९ टक्क्यांची घट झाली आहे. कोरोनामुळे पालिकेच्या तिजोरीवर भार आला आहे. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत सुमारे ४५० कोटी रुपये मुदत ठेवीतून काढण्यात आले असून आकस्मिक निधीतून ८५९ कोटी असे एकूण १३०० कोटी उचलण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नसून तो वाढतो आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यात एकूण पाच हजार कोटी रुपये मुदत ठेवीतून काढले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला : आज २० हजार ५९८ नव्या रुग्णांची नोंद
पालिकेच्या शुल्कात व कर वसुलीत जानेवारी ते मार्च या कालावधीत वाढ होते. मात्र, यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महसुलाला फटका बसला आहे. पालिकेचा मालमत्ता कर, विकास शुल्क आणि इतर करांची वसुली रखडली आहे. सन २०२०-२०२१ मध्ये एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत पालिकेला आठ हजार ३२० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात चार हजार ९०५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यातील तीन हजार ८०९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. कोरोनामुळे पालिकेला आर्थिक फटका बसला आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी पालिकेला मोठा कालावधी लागणार आहे. कोरोना उपाययोजनांवरील वाढता खर्च, सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला प्रशासकीय खर्च कसा भागवणार हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. उत्पन्नापेक्षा खर्च वाढत आहे. त्यामुळे मुदतठेवी मोडण्याशिवाय पालिकेला पर्याय नसल्याचे सांगितले जाते आहे.
हेही वाचा - मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोनावर मात
कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आदींसाठी आतापर्यंत सुमारे १३०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा खर्च येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा स्थितीत मुदतठेवी हाच आधार असणार आहे. पालिकेच्या विविध बँकांमध्ये सुमारे ८० हजार कोटींच्या मुदतठेवी आहेत. कंत्राटदारांच्या अनामत रक्कम, विकासकामांसाठी राखीव निधी, कर्मचारी निवृत्ती वेतन याचा मोठा भाग या ठेवींमध्ये आहे. त्यामुळे याचा विचार करून ठेवी मोडण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.