मुंबई - महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालयांमध्ये कंत्राटी तत्वावर नियुक्त असलेल्या काही डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांचा मे महिन्याचा पगार महापालिकेने कापून घेतला होता. मात्र, आरोग्य सेवा दिल्यामुळे त्यांचा पगार त्यांना देऊ, असे महापालिकेने आणि राज्य सरकारने नंतर सांगितले होते. परंतु, अद्याप त्या 200 डॉक्टरांना त्यांचा थकलेला पगार दिला गेला नाही. त्यामुळे अशा सर्व डॉक्टरांचा पगार ताबडतोब द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.
हेही वाचा - कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दीड लाखावर, आज नवीन ७ हजार ८२७ रुग्णांची नोंद
किरीट सोमैया यांनी आरोग्यमंत्री टोपे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय/हॉस्पिटलमध्ये कंत्राटी/तदर्थ (अॅड-होक) तत्वावर नियुक्ती असलेल्या डॉक्टर्सना कोरोनाबाधित झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावे लागले किंवा विलीगीकरण कक्षात जावे लागले. त्यांचा मे महिन्याचा पगार महापालिकेने कापून घेतला होता.
सध्या असे 200 डॉक्टर महापालिकेच्या विभिन्न हॉस्पिटल्स सायन, केईएम आणि नायर रुग्णालयामध्ये कामाला आहेत. मात्र, त्यांचा पगार कापलेला आहे. अशा सर्वांचा पगार ताबडतोब दिला जाणार, महापालिकेनी केलेली चूक सुधारली जाणार, अशी स्पष्टता मुंबई महापालिका आयुक्तांनी केली होती. परंतु, आजपर्यंत मे महिन्याचा कापलेला पगार अजून त्या डॉक्टरांना मिळालेला नाही. त्यामुळे डॉक्टरांना आर्थिक अडचण होत आहे. जून महिना आला तरी अजून पगार झालाच नाही. तो त्यांना त्वरित द्यावा, ही ताबडतोब कारवाई आरोग्यमंत्री करावी' अशी विनंती भाजप नेते सोमैया यांनी पत्र लिहून व्यक्त केली आहे.