मुंबई - जागतिक दर्जाचे शहर असलेली मुंबई कचरा मुक्त करण्यासाठी पालिकेकडून ( Mumbai Municipal Corporation ) गेले काही वर्षे प्रयत्न सूरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोसायटीमधील कचरा तीन डब्यांमध्ये गोळा केला जाणार आहे. ओल्या कचऱ्यापासून खत ( compost manure from waste )बनवले जाणार आहे. हे खत शेतकऱ्यांना मोफत वाटले जाणार आहे. मुंबईमधील उद्यानातही याचा उपयोग केला जाणार आहे. कुर्ला ( Kurla ) येथे याबाबत पथदर्शी प्रकल्प ( Pilot Project ) राबवला जाणार असून हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर संपूर्ण मुंबईत हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
कचऱ्याची विल्हेवाट
मुंबईमध्ये एकेकाळी नऊ हजार मॅट्रिक टन कचरा पालिकेकडून गोळा केला जात होता. हा सर्व कचरा डंपिंग ग्राउंडवर ( Dumping ground ) टाकला जात होता. यामुळे डंपिंग ग्राउंडवर कचऱ्याचे डोंगर उभे राहिले होते. कचऱ्याचे हे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्याची व्हिलेवाट लावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेने ( BMC ) २ ऑक्टोबर २०१७ पासून सोसायट्यांना कचर्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये २० हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आणि १०० किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणार्या इमारती-आस्थापनांना ओल्या कचर्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापनला प्रोत्साहन देण्यासाठी कचर्याचे वर्गीकरण, ओल्या कचर्यापासून खतनिर्मिती, सुक्या कचर्याची विल्हेवाट, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर किंवा पर्जन्य जल संधारण योजना राबविणार्या सोसायट्या-आस्थापनांना करात सूट देण्यात येत आहे. त्यामुळे कचर्याचे दिवसाचे प्रमाण सुमारे साडेपाच ते सहा हजार मेट्रिक टनांवर आले आहे.
कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपक्रम
कचऱ्याचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी सोसायट्यांना ओल्या कचर्यासाठी हिरवा, सुक्या कचर्यासाठी निळा आणि आरोग्यासाठी धोकादायक कचर्यासाठी काळ्या रंगाचे असे तीन डबे देणार आहे. कुर्ल्यापासून पालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात करण्यात येणार असून या ठिकाणी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण मुंबईत योजना राबवण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी सांगितले. कचर्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चाळी-झोपडपट्ट्यां तसेच सोसायट्यांमध्ये कंपोस्ट खत प्रकल्प उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. तर आता घरोघरी कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहे. कुर्ल्यातील उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर संपूर्ण मुंबईत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
अशी राबवणार मोहीम !
चाळी-झोपडपट्ट्या तसेच सोसायटीमधील कचर्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आता कंपोस्ट खत प्रकल्प उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. तर आता घरोघरी कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपक्रम राबवण्यात येत आहे. ओल्या कचर्यापासून कंपोस्ट खत बनवण्यासाठी तीन थर असलेले कंपोस्टिंग डब्बे देण्यात येतील. एक डब्बा भरल्यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा डब्बा भरण्याची व्यवस्था असले. एन्झाइमच्या वापरामुळे कंपोस्टिंग प्रकल्पात कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येणार नाही. तीन महिन्यांतंर खत तयार झाल्यानंतर हे खत पालिका घेऊन जाईल किंवा सोसायट्यांना आपल्या परिसरातील झाडे-उद्यानासाठी वापरता येईल. हे खत मुंबईत भाजी घेऊन येणार्या भागातील शेतकर्यांना मोफत दिले जाईल. पालिकेच्या उद्यानांमध्येही खत वापरता येईल. या उपक्रमासाठी झोपडपट्ट्या-सोसायट्यांना सुमारे २४० लिटर क्षमतेचे डब्बे पुरवण्यात येतील. यासाठी पालिकेच्या माध्यमातून धोरण तयार होत असल्याचे हसनाळे यांनी सांगितले.
हेही वाचा : राज्यात ९ हजार ५०२ रिक्षा चालकांवर कारवाई; २६१ रिक्षाचालकांचे परवाने निलंबन