मुंबई - मुंबईत गर्दीमुळे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई शहरात रेल्वे, एसटी बसने प्रवेश करताना, थिएटर, मॉलमध्ये प्रवेश करताना, खाऊ गल्ल्या, मार्केट, फेरीवाले, पर्यटन स्थळे तसेच सरकारी कार्यालयात प्रवेश करताना अँटीजन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. थिएटर, मॉलमध्ये प्रवेश करताना 250 रुपये देऊन अँटिजेन टेस्ट करावी लागणार आहे. मात्र मुंबईत हातावर मोजता येईल इतक्याच मॉलमध्ये अँटीजेन टेस्ट केल्या जात आहे, तर बहुतेक ठिकाणी याची अंमलबजावणी सुरुच झाली नसल्याचे समोर आले आहे.
काल सर्वाधिक रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. कोरोनाचा प्रसार झाल्याने लॉकडाऊन लावण्यात आला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर सर्व व्यवहार टप्प्याटप्याने सुरू करण्यात आले. त्यामुळे गर्दी होऊन पुन्हा फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत 18 मार्चला 2877, 19 मार्चला 3062, 20 मार्चला 2982 तर 21 मार्चला 3775 रुग्ण आढळून आले आहेत. या आधी मुंबईत गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला 2848 तर 8 ऑक्टोबरला 2823 रुग्णांची नोंद झाली होती. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामुळे महापालिकेने कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक ठिकाणी टेस्टला सुरुवातच नाही
मुंबईत 21 मार्चला वर्षभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने पालिका प्रशासनाने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. थिएटर, मॉल, खाऊ गल्ल्या, मार्केट, फेरीवाले आदी ठिकाणी अँटिजेंन टेस्ट करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. थिएटर, मॉलमध्ये प्रवेश करताना २५० रुपये भरून ही टेस्ट करावी लागणार आहे. मुंबईमध्ये अनेक थियेटर आणि मॉलमध्ये या टेस्ट सुरु झालेल्या नाहीत. गेले २ दिवस सुट्टी असल्याने पालिकेचे अधिकारी आज थियेटर मॉलला भेटी देऊन अँटीजेन टेस्ट सुरु करण्याच्या सूचना करत आहेत. मुंबईतील २७ मॉलपैकी हातावर मोजता येतील इतक्याच मॉलमध्ये टेस्ट करण्यास सुरुवात झाली. त्यातही कर्मचाऱ्यांनी रोज टेस्टसाठी २५० रुपये खर्च केल्यास त्यांनी सर्व पगार रोज टेस्ट करण्यात घालवायचा का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर मॉलमध्ये खरेदी करताना २५० रुपये टेस्टचे घेतले जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
47 हजार 800 अँटिजेन टेस्टचे टार्गेट
मुंबईमध्ये 27 मॉल असून, त्यांना प्रत्येक दिवसाला 400 प्रमाणे 10 हजार 800 अँटिजेन टेस्ट कराव्या लागणार आहेत. मुंबईतील 9 रेल्वे स्थानकावर प्रत्येकी 1 हजार प्रमाणे 9 हजार टेस्ट केल्या जाणार आहेत. 4 एसटी डेपोमध्ये प्रत्येकी हजार प्रमाणे 4 हजार टेस्ट कराव्या लागणार आहेत. मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डमध्ये गर्दीच्या ठिकाणी प्रत्येकी 1 हजार याप्रमाणे 24 हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. मुंबईत अशा एकूण 47 हजार 800 अँटिजेंन टेस्ट करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
रेल्वे स्टेशन, एसटी डेपोमध्ये अँटिजेंन टेस्ट
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर, बांद्रा, अंधेरी, बोरिवली, कुर्ला लोकमान्य टर्मिनस या ठिकाणी मुंबईबाहेरून मेल एक्स्प्रेस ट्रेन येतात. अशा या 9 रेल्वे स्थानकांवर प्रत्येकी 1 हजार प्रमाणे 9 हजार अँटिजेंन टेस्ट केल्या जाणार आहेत. तसेच मुंबईत एसटीच्या मार्गाने मुंबई सेंट्रल, परेल, बोरिवली आणि कुर्ला डेपोमध्ये प्रवासी येतात. या चारही एसटी डेपोमध्ये प्रत्येकी 1 हजार प्रमाणे 4 हजार अँटिजेन टेस्ट केल्या जाणार आहेत.