मुंबई - मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार व वाढणारी लोकसंख्या पाहता, मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्तांची गरज आहे. अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शहर विकास विभागाकडे केली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी दोन आयुक्त
अस्लम शेख म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून, देशातील विविध भागांतून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. याचाच परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महानगरपालिकेची असते. परंतू सध्या महानगरपालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरीकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरीकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन पालिका आयुक्त असणं गरजेचे आहे.
मागणी जोर धरू लागली
पी-उत्तर वाॅर्डच्या विभाजनास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिल्यानंतर आता पालिकेसाठीही दोन आयुक्तांची मागणी जोर धरू लागली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आल्यास मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय व्यवहार करणे सोपे होईल. सध्या मुंबई शहर व उपनगरसाठी दोन जिल्हाधिकारी आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन आयुक्तांची पदे निर्माण करावीत अशी मागणी शेख यांनी केली आहे.