मुंबई - शहरात मालाड येथील भिंत पडून झालेल्या दुर्घटनेत मृतांना आणि जखमींना पालिकेकडून नुकसान भरपाई देण्यात आली. त्याचप्रमाणे झाडे पडणे, गटारात वाहून जाणे आदी घटनांमधील मृत आणि जखमींनाही नुकसान भरपाई देता यावी. यासाठी पालिकेने ठोस धोरण ठरवावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी व मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी केली आहे.
मालाड पिंपरी-पाडा आणि आंबेडकर नगर येथे पालिकेच्या जलाशयाची भिंत कोसळून जूलै महिन्यात ३१ जणांचा मृत्यू झाला तर ६८ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेमधील मृतांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. या प्रस्तावावर बोलताना पालिकेकडून अशी आर्थिक मदत पहिल्यांदाच देण्यात येत आहे. मात्र ही मदत या दुर्घटनेपर्यंत मर्यादित न ठेवता इतर नैसर्गिक आणि दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या तसेच जखमी होणाऱ्यांना देण्यात यावी. यासाठी ठोस धोरण असावे अशी मागणी रावी राजा यांनी केली. यानंतर पालिका प्रशासनाकडून असे धोरण बनवण्याचा विचार केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
मुंबई नगरपालिकेची स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली. या वेळी मालाड दुर्घटनेत नागरिकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांच्या घरांचे काय? असा प्रश्न भाजपाचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी झाडे पडून मृत्यू झाले त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याबाबत कोणता निणर्य घेण्यात आला आहे? असा प्रश्न उपस्थित केला. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी मुख्यमंत्री निधी प्रमाणे नागरिकांना मदत करता यावी म्हणून निधी उभारण्याची मागणी केली. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अशा धोरणाबाबत प्रशासनाने खुलासा करावा असे निर्देश दिले. त्यावर अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी पालिकेकडे अशा प्रकारे आर्थिक निधी देण्याबाबत कोणतेही धोरण नसले तरी तसे धोरण बनवण्याचा विचार केला जाईल असे सांगितले.