मुंबई - एकेकाळी मित्रपक्ष असलेले शिवसेना आणि भाजप अनेक मुद्द्यांवर आमने-सामने आलेले पाहायला मिळाले आहेत. आता मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांवरून हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने गेल्या २४ वर्षांत २१ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. ही रक्कम पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या टोळीने खड्ड्यात घातल्याचा आरोप भाजपा आमदार अमित साटम यांनी केला आहे. यावर साटम यांच्या स्वप्नात अचानक कोण आले, त्यांच्या स्वप्नात खड्डे आले असावेत. पालिकेवर प्रश्न उपस्थित करून साटम यांनी आपल्याच पक्षातील नगरसेवकांच्या अकार्यक्षमतेवर शिक्का मारला आहे, साटम यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लगावला आहे.
'२१ हजार कोटी खड्ड्यात घातले'
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिकेकडून माहिती अधिकारातून गेल्या २४ वर्षात रस्त्यांवर किती रक्कम खर्च करण्यात आली, याची माहिती मागवली होती. ही माहिती आल्यावर साटम यांनी खड्डे असलेल्या रस्त्यावर उभे राहून, एका व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत त्यांनी गेल्या २४ वर्षात पालिकेने २१ हजार कोटीहून अधिक रक्कम खर्च केली आहे. ही रक्कम पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या टोळीने खड्ड्यात घातल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. २१ हजार कोटी खड्ड्यात घालणारी पालिकेतील वाझे टोळी कोण? मुंबईत रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते हा प्रश्न रोज निर्माण होतो, असे प्रश्न साटम यांनी उपस्थित केले आहेत. उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल केल्यावर काही लोकांवर दिखाव्यासाठी थातुर-माथूर कारवाई केली जाते, असा आरोपही साटम यांनी केला आहे.
'खड्डे त्यांच्या स्वप्नात आले का?'
साटम यांनी सांगितलेली माहिती कितपत खरी आहे आणि योग्य आहे हे माहीत नाही. साटम यांनी अशी माहिती काढली आहे, म्हणजे ते खरेच असणार असे मान्य करायला हवे. ते महापालिकेत अनेक वर्ष नगरसेवक होते. त्यावेळी त्यांनी असे प्रश्न विचारायला हवे होते. आता ते आमदार झाले आहेत. त्यांच्या पक्षातील नगरसेवक महापालिकेत आहेत. त्या नगरसेवकांनी याची माहिती पालिकेला विचारावी. प्रशासन त्यांना योग्य अयोग्य त्याचे उत्तर देईल. मात्र, इतकी वर्ष अमित साटम का थांबले? हा प्रश्न आहे. अचानक त्यांना कोणता साक्षात्कार झाला. त्यांच्या स्वप्नात कोण आले. खड्डे त्यांच्या स्वप्नात आले का? असे प्रश्न स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उपस्थित केले आहेत. साटम हे आमदार आहेत त्यांनी विधिमंडळातील काम करावे. पालिकेवर प्रश्न उपस्थित करून, त्यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांवर अकार्यक्षमतेवर शिक्का मारला आहे, असा टोलाही यशवंत जाधव यांनी साटम यांना लगावला आहे. दरम्यान, साटम यांनी आत्मपरीक्षण करावे असा प्रेमाचा मी त्यांना सल्ला देतो असही जाधव म्हणाले आहेत.