मुंबई - प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच राष्ट्रीय हरितलवादाने मुंबईतील नद्यांमध्ये होणाऱ्या प्रदूषण प्रकरणी अनेकवेळा फटकारल्यानंतर दहिसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचे पुनरुज्जीवीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र वालभाट आणि ओशिवरा नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रस्ताव राखून ठेवत फक्त दहिसर नदीचे सौंदर्यीकरण प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही मंजूरी देण्यात आली आहे. दहिसर नदीचे सौंदर्यीकरण, अतिक्रमण हटवणे तसेच कच-याने भरलेले नाले साफ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देत पालिकेने यासाठी १०७ कोटी रुपये खर्च करण्यास मंजूरी दिली आहे.
नद्यांचे सौंदर्यीकरण -
मुंबईतील नद्यांमध्ये होणा-या प्रदूषणाक़डे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वारंवार प्रदूषण मंडळ तसेच हरित लवादाने पालिकेला अनेकवेळा खडेबोल सुनावले आहे. काहीवेळा दंडही आकारला आहे. नद्यातील सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करा अशा सूचनाही देण्यात आल्या होत्य़ा. याकडे लक्ष वेधून अखेर महापालिकेने दहिसर, वालभाट, ओशिवरा नदीचे सौंदर्यीकरण व इतर उपाययोजना करून प्रदूषण रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल १ हजार ३०४ कोटी ५१ लाख रुपये खर्च करणार आहे. यामध्ये, दहिसर नदीच्या पुनरुज्जीविकरण, सौंदर्यीकरण आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी १०७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
ओशिवरा, वालभाट केव्हा घेणार मोकळा श्वास
वालभाट, ओशिवरा या नद्यांच्या पुनरुज्जीविकरण, सौंदर्यीकरण आणि सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ९२८ कोटी ४६ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. मात्र स्थायी समितीने यातील दहीसर नदीचा प्रस्ताव मंजूर करीत वालभाट व ओशिवरा नदीचा प्रस्ताव परत राखून ठेवला. दहिसर नदीच्या सौंदर्यीकरणासाठी १०७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यात सौंदर्यीकरण, व नदीच्या बाजूची अतिक्रमणे हटवण्याचे काम केले जाणार आहे.
सांडपाण्यामुळे दहिसर नदी प्रदूषित -
मुंबईतील पश्चिम उपनगरातील नॅशनल पार्क येथून दहिसर नदीचे उगम होऊन ती धोबिघाट, संजय नगर, लिंक रोडमार्गे मनोरी खाडीत विसर्जित होते. या नदीची लांबी १३ किमी आहे. या नदीच्या रुंदीकरण, संरक्षक भिंतीचे ९० टक्के काम तर पोच रस्त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. दरम्यान या नदीच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्टीमधून, सोसायटीमधून वाहून येणारे सांडपाणी, श्रीकृष्ण नगर व आंबेवाडी येथील तबेल्यातील शेणमिश्रित पाणी हे नदीत सोडले जाऊन नदी प्रदूषित झाली आहे
हेही वाचा : राज्यात अतिवृष्टीमुळे १७ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान, विजय वडेट्टीवार यांची माहिती