मुंबई - इंग्रजी शाळांच्या बरोबरीने अन्य शाळांचा दर्जा आणि त्यासाठी आवश्यक शिक्षण देण्यासाठी महापालिकेने उचलेले पाऊल मराठीतून शिक्षण घेतलेल्या शिक्षकांसाठी अडचणीचे ठरले आहे. तर दुसरीकडे महापालिका शाळेत इंग्रजी माध्यमासाठी शिक्षकांच्या नोकऱ्या उपलब्ध असतानाही आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असताना त्यासाठी आवश्यक दर्जाचे शिक्षक मिळणे कठीण झाल्याची बाब समोर आली आहे.
महापालिकेने शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि इंग्रजी शाळांसोबत निर्माण झालेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी अनेक बदल केले आहेत. त्याच धर्तीवर मराठी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देणारे आणि इंग्रजी चांगले असलेल्या शिक्षकांची भरती करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.
यामधील काही शिक्षकांचे व्यावसायिक शिक्षण इंग्रजीतून झाले नसल्याने अनेकांची महापालिकेत शिक्षक होण्याची संधी हुकली आहे. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर संबंधित बाब समोर आली आहे.
काय आहे प्रकरण..?
महापालिकेने सरकारी शाळांमध्ये इंग्रजी शाळांच्या धर्तीवर शिक्षण मिळावे, यासाठी 2008 साली नवीन धोरण आणले. यानुसार इंग्रजीतून पूर्ण शिक्षण झालेल्या तसेच व्यावसायिक शिक्षण इंग्रजीतून घेतलेल्या शिक्षकांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण विभागाने माध्यमिक, उच्च प्राथमिक आणि मुंबई पब्लिक स्कूलसाठी शिक्षक भरतीची जाहहिरात काढली. यामध्ये माध्यमिक, उच्च प्राथमिक ज्या शिक्षकांचे शिक्षण मराठीतून आणि डी.एड, बी.एड ही व्यावसायिक अर्हता इंग्रजीतून झाली आहे, असे 370 शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू केली.
मात्र सरकारच्या शिक्षकांसाठी असलेल्या 'पवित्र पोर्टल'कडून 280 शिक्षकांची यादी पालिकेच्या शिक्षण विभागाला सोपवण्यात आली. यामध्ये 275 शिक्षक पात्र ठरले, तर दोन जणांनी अंतिम मुलाखतीला दांडी मारली. तसेच ऐनवेळी यामधील तीन जणांचे व्यावसायिक शिक्षण इंग्रजीतू झाले नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. मुंबई पब्लिक स्कूलसाठी निवडण्यात येणाऱ्यांचे संपूर्ण शिक्षण इंग्रजीतून होणे आवश्यक होते. त्यासाठी 339 शिक्षकांची गरज होती. मात्र पवित्र पोर्टलकडून केवळ 74 जणांची यादी आली. यामधील 57 पात्र ठरले. उर्वरित 12 जण गैरहजर राहिले. तसेच जे पाच अपात्र ठरवण्यात आले त्यांचे शिक्षण मराठीतून झाले होते.
इंग्रजी नसल्याने 108 ठरले अपात्र
माध्यमिक शाळांसाठी इंग्रजीचे शिक्षण असलेल्या 217 शिक्षकांची गरज असताना पवित्रने 221 जणांची यादी दिली. यातील केवळ 70 शिक्षक पात्र ठरले. 40 जण अनुपस्थित राहिले. तसेच 111 जण अपात्र ठरले. परंतु, यामधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे 108 जणांचे शिक्षण इंग्रजीतून झाले नव्हते. तसेच दोन उमेदवारांना 45 टक्क्यांहून कमी गुण असल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. तर एकाची वयोमर्यादा संपल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेत सध्या मुंबई पब्लिक स्कूलच्या 68 शाळांमध्ये 30 हजार 410 विद्यार्थी शिकत आहेत. तर इंग्रजी माध्यमाच्या उच्च प्राथमिकमच्या 51 शाळांमध्ये आठ हजार 887 शाळांमध्ये 33 हजार 349 विद्यार्थी आहेत. यासाठी सध्या आठ हजार 887 शिक्षक कार्यरत आहेत.