मुंबई - ९ तारखेला महिलेला राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी महिला अत्यवस्थ होती. प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. अडीच ते ३ तास शस्त्रक्रिया चालली. मात्र डॉक्टर या महिलेला वाचवू शकले नाहीत, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
'पोलीस योग्य ती कारवाई करतील'
त्या म्हणाल्या, १० ते १२ वर्षांपासून त्या दोघे एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात भांडण सुरू होते. आरोपी व्यक्ती संबंधित महिलेला मारहाण करीत होता. दरम्यान, घटनेच्या दिवशीही मारहाण करण्यात आली. स्थानिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल केले. तर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस योग्य ती कारवाई करतील.
'कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा'
महाराष्ट्रात मुलींवर अत्याचारांचे सत्र थांबत नाही. पुण्यामध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले. त्यानंतर मुंबईकर महिलेवर बलात्काराची दुर्देवी घटना घडली. दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार घटनेने सारखे ही घटना आहे. पोलिसांनी एका आरोपीला पकडला आहे असं पोलिस सांगत आहेत. मात्र पेक्षाही अधिक आरोपी या बलात्कारात सामील असतील. या सर्व घटना पाहता राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, असा आरोप भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
'ठोस पावले उचचली नसल्याचे दिसते'
ही घटना म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. पोलिसांनी वेळेत पुरावे जमा करायला हवेत. त्यामुळे आरोपीस शिक्षा होईल. मुंबई पोलिसांचा धाक कमी झाला आहे. गुन्हेगार बेफाम झाले आहेत. बदली आणि प्रमोशनसाठी व्यवहाराची गणिते सुरू झाली आहेत. त्यानंतर कर्तव्य आणि अचूक काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबाबत योग्य भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे आता तरी पोलिसांनी आपले काम चोख करावे. अशा घटना राज्यात वाढत आहेत, मात्र राज्याच्या प्रमुखांनी अद्यापही काही ठोस पावले उचलली नसल्याचे दिसत आहे, असे भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले.