मुंबई - कोरोनाचा मुंबईत विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पालिकेने नागरिकांच्या उपचारासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली आहे. आम्ही केलेले आयोजन व मेहनत सर्व फुकट गेले तरी चालेल. पण मुंबईकरांनी आपली काळजी घेऊन कोरोनापासून वाचले पाहिजे, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. त्या पत्रकार परिषेदत बोलत होत्या.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आणि टार्गेट पब्लिकेशनकडून 'क्विल द पढाई अॅप' हे अॅप सुरू करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी महापौर म्हणाल्या की, रुग्ण संख्या वाढत आहे. त्यासाठी पालिकेने काळजी घेतली आहे. मुंबईत १४ हजार बेड होते. त्यांची संख्या २५ हजारापर्यंत वाढविली जात आहे. सध्या अनेक ठिकाणी बेड रिक्त आहेत. पण काही लोकांकडून आम्हाला हेच रुग्णालय पाहिजे, अशी मागणी केली जाते. असे बेड मिळावेत म्हणून फोन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण नागरिकांनी तसे न करता जिथे बेड असतील तिथे उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले. गेल्या वर्षीपेक्षा मृत्यूदर खूप कमी आहे असेही महापौरांनी सांगितले. लसीकरणाला याआधी खूप प्रतिसाद कमी मिळत होता. मात्र गेल्या आठवड्यापासून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा-आगीनंतर मॉल बंद झाल्याने आर्थिक मदत देण्याची दुकानदारांची मागणी
नाईट कर्फ्युचा कामावर जाणाऱ्यांना त्रास नाही -
नियमानुसार एखाद्या इमारतींमध्ये ५ रुग्ण आढळून आल्यास ती इमारत सील केली जात आहे. गर्दी होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. लोकल ट्रेनमध्ये गर्दी होत असल्याने कामाच्या वेळा बदलण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. त्याला सर्व नागरिकांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन महापौरांनी केले. राज्यात रात्र संचारबंदीचे आदेश सरकारने दिले आहेत. मुंबईलाही ते नियम लागू असल्याने येत्या दोन दिवसात मुंबईतही रात्री संचारबंदी लागू होईल. अत्यावश्यक सेवा वगळता रात्रीचे सर्व व्यवहार बंद केले जाणार आहेत. कामावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. घराबाहेर पडताना आणि कामावरून घरी जाताना ओळखपत्र सोबत ठेवा, म्हणजे नागरिकांना त्रास होणार नाही असे महापौर म्हणाल्या.
हेही वाचा-'फॅशन स्ट्रीट'च्या आगीत 500 पेक्षा जास्त दुकाने खाक
भांडुप आगीची चौकशी -
भांडुप येथील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आगीमधील मृत्यू झालेल्या रुग्णांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच चौकशीचे आदेशही दिले आहेत. त्यानुसार पालिका आयुक्तांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदले यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. त्याचा अहवाल १५ दिवसात सादर होणार आहे. अहवालातून जे काही असेल ते समोर येईल. मॉलमध्ये हॉस्पिटल नसावे, अशा मताची मी आहे. येथून पुढे मॉलमध्ये हॉस्पिटल नसेल असे महापौरांनी स्पष्ट केले आहे.
१० वी व १२ विद्यार्थ्यांसाठी अॅप -
कोरोनाच्या महामारीत शिक्षण मागे राहता कामा नये यासाठी १० वी, १२ वी विद्यार्थ्यांसाठी 'क्विल द पढाई अॅप' नवे अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपवर एसएससी बोर्डाच्या सर्व भाषेचा अभ्यासक्रम असणार आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची २० दिवसांवर परीक्षा आली आहे. त्याचा अभ्यास करताना याचा उपयोग होईल. हे अॅप फक्त मुंबईसाठी नसून त्याचा उपयोग महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना होईल, असेही महापौरांनी सांगितले.