मुंबई - दक्षिण मुंबईतील 16 हजार उपकरप्राप्त जुन्या-मोडकळीस आलेल्या इमारतीच्या सर्वेक्षणाचे काम याही वर्षी कोरोना-लॉकडाऊनमुळे विलंबाने सुरू झाले आहे. तेव्हा याही वर्षी अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर करण्यास म्हाडाकडून विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने मात्र आता आम्ही सर्वेक्षणाच्या कामाला वेग दिला आहे. त्यानुसार 30 मे अखेरपर्यंत यादी जाहीर होईल असा दावा अरुण डोंगरे, मुख्य अधिकारी, दुरुस्ती मंडळ यांनी केला आहे.
दरवर्षी 15 मे च्या आत जाहीर करावी लागते यादी
40 ते 100 वर्षांहून अधिक जुन्या इमारतीचा समावेश उपकरप्राप्त इमारतीत होतो. अशा 19 हजार इमारती दक्षिण मुंबईत होत्या. त्यातील काही इमारतीचा पुनर्विकास झाला तर काही कोसळल्या. आता अंदाजे 16 हजार इमारती असून या सर्व इमारती धोकादायक झाल्या आहेत. या इमारतीचा लवकर लवकरात पुनर्विकास होणे गरजेचे आहे. मात्र या इमारती मोठ्या संख्येने असून पुनर्विकासात अनेक अडचणी आहेत. मात्र यासाठी ठोस धोरण अजूनही आखण्यात आलेले नाही. तेव्हा आजही या इमारतीत लाखो रहिवासी जीव मुठीत धरून जगत आहेत. अशावेळी केवळ दुरुस्तीवर वेळ निभावून नेली जात आहे. यातील अनेक इमारतींची दुरवस्था झाली असून, त्या मोडकळीस आल्या आहेत.
यंदाही यादीला विलंबच
पावसाळ्यात या इमारती कोसळण्याच्या घटना मोठ्या संख्येने घडतात. याच दुर्घटना टाळण्यासाठी मागील काही वर्षांपासून दुरुस्ती मंडळाकडून पावसाळ्याच्या आधी सर्व इमारतीचे सर्वेक्षण करण्यात येते. तीन-चार महिने हे काम सुरू असते, आणि यात इमारतीची अवस्था लक्षात घेत अतिधोकादायक इमारतींची यादी दरवर्षी 15 मे च्या आत जाहीर केली जाते. त्यानंतर या इमारतीतील रहिवाशांना नोटीस देत जूनच्या पहिल्या आठवड्यात या इमारती रिकाम्या करण्यात येतात. काही रहिवासी स्वतः स्वतःची सोय करतात. तर ज्यांना इतर पर्याय नसतो ते मंडळाच्या संक्रमण शिबिरात राहायला जातात. एकूणच इमारती रिकाम्या करून घेतल्या नंतर एखादी दुर्घटना घडलीच तर जीवितहानी टळली जाते. त्यामुळे ही यादी आणि प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. पण मागील वर्षी ही यादी उशिरा जाहीर झाली, तर यंदा ही उशिर झाला आहे. अशावेळी जर पावसाळ्यात अतिधोकादायक इमारती रिकाम्या झाल्या नाहीत आणि कोणती दुर्घटना घडली तर याला कोण जबाबदार असा प्रश्न निर्माण होत आहे.
'सर्वेक्षणाला वेग'
गेल्या वर्षी प्रमाणे यंदा सर्वेक्षणाच्या काळातच कोरोनाचा कहर आणि लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हा या संकटाच्या काळात प्रत्येक इमारतीत जाऊन सर्व्हे करणे धोक्याचे आणि अवघड आहे. मात्र हे काम महत्त्वाचे आणि गरजेचे असल्याने कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत काम 50 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण करू. त्यानुसार 30 मेपर्यंत यादी जाहीर करू. एखादा आठवडा मागे पुढे होईल पण त्यापेक्षा जास्त विलंब होणार नाही ,अशी माहिती डोंगरे यांनी दिली आहे. तेव्हा 30 मे वा त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत यादी जाहीर होते का हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - इथे कोरोनाला कोणीच घाबरत नाही? मालेगावकरांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन