मुंबई - वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्हा रद्द करण्यात यावा याकरिता रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज (शुक्रवारी) या याचिकेवर सुनावणी करण्यात आली असून रश्मी शुक्ला यांना 1 एप्रिल पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहे.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना तपासामध्ये सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे. 16 मार्च आणि 23 मार्च रोजी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 11 वाजता चौकशीला अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यात झाला गुन्हा दाखल
रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणात सर्वात पहिला गुन्हा पुणे जिल्ह्यात दाखल झाला होता. त्या तक्रारीविरोधात रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज मुंबई उच्च न्यायालयाने पुणे आणि कुलाबा येथील दोन्ही गुन्ह्यातील सुनावणी एकत्र करून दोन्ही याचिकेवर 1 एप्रिल रोजी एकत्र सुनावणी ठेवण्यात आली आहे.
फोन टॅपिंग प्रकरणात केली अटक
राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम 26 तसेच भादवि कलम 166 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून 2019 मध्ये अनिष्ठ राजकीय हेतूने या दोन्ही नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅप झाल्याचे एफआयआरमध्ये नमूद केले आहे. टेलिग्राफ ऍक्टनुसार राष्ट्रीय सुरक्षा अथवा मोठा गुन्हा रोखण्याच्या हेतूने फोन टॅपिंग केले जाते. परंतु असे कोणतेही ठोस कारण नसताना शुक्ला यांनी या दोन्ही नेत्यांचे फोन टॅप का केले त्यामागचे कारण स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - Rashmi Shukla in Mumbai High Court : रश्मी शुक्ला यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव; कुलाबा स्थानकात दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी