मुंबई - गेल्या वर्षात राज्यात २६ हजार २८४ रस्ते अपघात झाले. यामध्ये १४ हजार २६६ प्रवासी जखमी झाले असून रस्ते अपघातात ११ हजार ९६० प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सर्वाधिक अपघात हे मुंबईत झाल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी - नोव्हेंबर 2021 या अकरा महिन्यांत मुंबईत ( Mumbai highest number of accidents ) १ हजार ८४४ रस्ते अपघात झाले आहे. यामुळे मुंबईतील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - Self Test Kit in Mumbai : ३ लाखापैकी ९८ हजार ९५७ चाचण्यांचे अहवाल, इतरांचे अहवाल गायब
राज्यात २६ हजार २८४ अपघात -
राज्यात २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये ( accidents in the Maharashtra ) अधिक अपघात झाल्याचे निदर्शनास आले आहे. २०२० मध्ये लॉकडाऊन असतानाही राज्यातील अपघातांची संख्या २४ हजार ९७१ वर पोहचली होती. या अपघातांमध्ये ११ हजार ५६९ नागरिकांना प्राणांना मुकावे लागले, तर १३ हजार ९७१ लोक गंभीर जखमी झाले होते. या उलट २०२१ मधील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अपघातांमध्ये २६ हजार २८४ पर्यंत वाढ झाली आहे. या शिवाय संबंधित अपघातांमध्ये ११ हजार ९६० प्रवाशांचा हकनाक जीव गेला असून १४ हजार २६६ लोक गंभीर जखमी झाले.
विशेष म्हणजे, राज्यातील सर्वाधिक अपघात हे मुंबईत झाल्याची माहिती समोर आली. जानेवारी - नोव्हेंबर या अकरा महिन्यांत मुंबईत १ हजार ८४४ रस्ते अपघात झाले. या अपघात २५८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, १ हजार २४३ लोक गंभीर जखमी झाले.
या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अपघात -
मुंबई १ हजार ८४४, नाशिक १२९६, पुणे १२२८, अहमदनगर १२०७, कोल्हापूर ९२६, सोलापूर ८६२, नागपूर ८६०, सातारा ७२९, ठाणे ७०७, नांदेड ६९३, जळगाव ६६७, बीड ६३२, चंद्रपूर ६२८ या जिल्ह्यात जानेवारी - नोव्हेंबर २०२१ या अकरा महिन्यांत सर्वाधिक अपघात झाले.
सर्वाधिक अपघाती मृत्यू या जिल्ह्यांत -
जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या अकरा महिन्यांत रस्ते अपघातांमध्ये ११ हजार ९६० प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघाती मृत्यूमध्ये वाढ झालेल्या जिल्ह्यामध्ये नाशिकचा पहिला क्रमांक लागतो. नाशिकमध्ये ७८४, पुणे ७२०, सोलापूर ४८३, सातारा ४३५, अहमदनगर ६९३, जळगाव ४४३, बीड ३८५, कोल्हापूर ३४६ आणि औरंगाबादमध्ये ३६५ अपघाती मृत्यू झाले आहेत.