मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी कोरोना कृती दलाची बैठक बोलावली आहे. सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून जवळपास पन्नास हजाराहून अधिक रुग्ण दररोज सापडत असल्याने टाळेबंदी लावावी, असे मत कृती दलाने व्यक्त केले आहे. टाळेबंदी लावल्याने कोरोना संसर्गाची साखळी तुटायला मदत होईल आणि राज्यात मोठ्या प्रमाणात सापडणार्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होईल, असा विश्वास कृती दलाच्या सदस्यांचा आहे. त्यामुळे कृती दलाच्या बैठकीत टाळेबंदी लावण्यासंदर्भातचा निर्णय होऊ शकतो, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.
काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत टाळेबंदीबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांनी सहमती दर्शवली. मात्र, पुढे राज्य सरकारला कोणती पावले उचलावी लागतील, यासाठी कृती दलाची ही बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे. आज कृती दलाशी होणाऱ्या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली.
नागरिकांना वेळ दिला जाईल
महाविकास आघाडी सरकारकडून टाळेबंदीचा निर्णय तडकाफडकी घेतला जाणार नाही. कोणताही निर्णय सामान्य नागरिकांवर लादला जाणार नाही. टाळेबंदी लावण्याआधी नागरिकांना वेळ दिला जाईल, असा विश्वास अस्लम शेख यांनी राज्यातील जनतेला दिला. लसीकरणाचा महोत्सव कसा साजरा करणार? हा प्रश्न आम्हाला विरोधकांना आणि केंद्राला विचारायचा आहे. वेळोवेळी आम्ही लसीकरण वाढवत असताना राज्याला लसीचा पुरवठा कमी केला जातोय. राज्यात रुग्ण वाढत आहेत. तसेच लस पुरवठा करण्याची सातत्याने मागणी केली जातेय. मात्र, आजही केवळ मुंबईसाठी दोन लाख 35 हजार एवढाच लसीचा साठा पाठवण्यात आलेला असून, हा साठा केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच आहे. उत्तर प्रदेशला रुग्णसंख्या कमी असताना लस जास्त दिली जात आहे. तसेच मुंबईत वाढती रुग्णसंख्या पाहता नवीन चार जम्बो कोरोना केंद्रे उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याची माहिती पालकमंत्री शेख यांनी दिली.