मुंबई - मुंबईतील नव्हे तर देशातील पहिल्या कोस्टल रोडचे काम सध्या जोमाने सुरू आहे. सध्या भुयारी मार्गाचे काम जलदगतीने सुरू आहे. आतापर्यंत 160 मीटरपेक्षाही जास्त लांबीचे भुयारी मार्ग खोदण्यात आले आहेत. या कोस्टल रोडच्या उभारणीमुळे मुंबईकरांचा विशेषतः पश्चिम उपनगरातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. आतापर्यंत 25 टक्क्यांपेक्षाही जास्त काम झाले आहे. हा कोस्टल रोड प्रकल्प म्हणजे मुंबईतील लोकांच्या मनातला विकासाचा प्रकल्प आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
तीन ठिकाणी इंटरचेंज
राज्याचे वस्त्रोद्योग आणि मत्स्य विकास मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी या कोस्टल रोडच्या भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी केली आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कोस्टल रोड प्रकल्पाच्या पॅकेज 4 अंतर्गत प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत प्रत्येकी 2.07 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे मावळा सयंत्रणाने म्हणजेच (टनेल बोरिंग मशीन)ने खोदण्यात येत आहे. एक बोगदा उत्तर मुंबईकडे जाणारा तर दुसरा बोगदा दक्षिण मुंबईकडे येणारा असणार आहे. या बोगद्याला अमरसन्स, हाजीअली आणि वरळी या तीन ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. 11 ठिकाणी दोन्ही टनेल एकमेकांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे आप्त काळात एका बोगद्यामधून दुसऱ्या बोगद्यात जाता येणार आहे.
18 महिन्यांचा कालावधी लागणार
बोगदा खोदण्यासाठी नऊ महिने याप्रमाणे 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कोस्टल रोडच्या संपूर्ण बांधकामावर 12 हजार 721 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. आतापर्यंत 160 मीटरचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती कोस्टल रोडच्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
'प्रत्येकाच्या मनातील प्रकल्प'
मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज या कोस्टल रोड कामाला भेट दिली असता माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की हा कोस्टल रोड प्रकल्प म्हणजे मुंबई शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातील एक विकासाचा प्रकल्प आहे.