मुंबई - खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युसूफ लकडावाला हे डी गँगशी संबंधित नाव असून त्याच्याकडून नवनीत राणांनी 80 लाखांचं कर्ज घेतले होते. आता या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघाडीकडून मुंबई पोलिसांकडे याबाबत लवकरच तक्रार दाखल केली जाण्याची शक्यता आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर ईओडब्लू कडून चौकशी सुरू करण्यात येणार आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषणकडून आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमैय्या आणि नील सोमैय्या यांची चौकशी सुरू आहे.
खोटे आरोप केल्याचा गुन्हा दाखल होणार - मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला होता. याबाबतचे एक पत्र लोकसभा अध्यक्षांना लिहिले होते. नवनीत राणा यांना मुंबई पोलिसांवर हे आरोप करणे भोवणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करत खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना आदराची वागणूक देण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे नवनीत राणा यांचा दलित कार्डचा प्लॅन फेल झाला असल्याची चर्चा सुरू आहे. आता मुंबई पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी नवनीत राणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांचा आरोप - युसूफ लकडावाला याला 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांचा लॉकअपमध्येच मृत्यू झाला. तो अटकेत असताना त्याच्या अकाउंटमधून ज्या ज्या लोकांना पैसे गेले अथवा ज्यांनी ज्यांनी त्याच्याशी आर्थिक व्यवहार केले, त्या सर्वांची चौकशी झाली. मग या राणा दाम्पत्यालाच का सुट दिली? युसूफच्या अवैध कमाईचा काही भाग अजूनही नवनीत राणाच्या खात्यात आहे. मग ED ने ही सूट का दिली? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राणा मागासवर्गीय नाही, भुजबळांचे आरोप - आपण मागासवर्गीय असल्यामुळे अटकेत असताना आपल्याला पाणी दिले नाही. शौचालयाचा वापर करू दिला नाही, असा आरोप नवनीत राणांनी पोलिसांवर केला आहे. मात्र, नवनीत राणा या मागासवर्गीय नाही, असे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court On Naneet Rana ) सांगितले आहे. आता या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले असले तरी, ते मागासवर्गीय आहेत का? याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहेत. तसेच, पोलीस स्टेशनमध्ये अन्याय झाला असे राणा म्हणत असतील तर, पोलिसांविरोधात त्यांनी तक्रारही केली नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
नक्की खरे कोण हे प्रश्नचिन्ह, किशोरी पेडणेकरांची टीका - भाभा रुग्णालयाला खोटे ठरवले जात आहे. रुग्णालय, पोलीस आणि मीडियालाही खोटे ठरवले जात आहे. नक्की खरे कोण हे प्रश्न उपस्थित झाले आहे. जखम नव्हती पण ती दाखवली जात होती. रुग्णालयाने त्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची तपासणी करायला हवी होती. ०.१ ला जखम किंवा खरचटले, असे म्हटले जाते नाही. ती सुपरफिशल जखम होती. त्याचा गाजावाजा झाला, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - MP Navneet Rana : घरचे जेवण मिळावे यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा न्यायालयाकडे अर्ज