मुंबई - मुंबईचा डबेवाला म्हटलं की, पांढरी टोपी घातलेली, गळ्यात माळ घातलेली एक शांत स्वभावाची व्यक्ती सर्वांच्या डोळ्यासमोर उभी राहते. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का लाखो मुंबईकरांचं पोट भरणाऱ्या या डबेवाल्यांची मामांची सध्याची स्थिती काय आहे? लॉकडाउन काळात आणि आता सर्व काही सुरळीत झाल्यानंतर या डबेवाल्यांच्या जीवनात नक्की काय फरक पडलाय ? हेच जाणून घेण्यासाठी आम्ही एक दिवस डबेवाल्यांची सोबत घालवला.
वेगानं काम करावं लागतं - या संदर्भात बोलताना मच्छिंद्र जगताप सांगतात की, "आम्ही सकाळी साडेआठ वाजता घर सोडतो. त्यानंतर आम्ही आमची सायकल घेऊन डबे गोळा करण्यासाठी आमच्या मार्गावर निघतो. आमचा एक डबा एका टोकाला तर दुसरा डबा दुसऱ्या टोकाला असतो. यात साधारण सहा ते दहा किलोमीटरचा अंतर असतं. अशाप्रकारे दिवसभरात आम्ही तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर रोज सायकलने कापतो. त्यासाठी आम्हाला खूप वेगाने काम करावं लागतं."
लॉकडाऊन मध्ये कोणीच मदत केली नाही - जगताप पुढे बोलताना सांगतात की, "आमचा लॉकडाऊनचा काळ खरंच खूप वाईट होता. सर्वच बंद होतं. आम्ही घरीच अडकून होतो. आमचं काम देखील बंद होतं. अशा वेळेत कोणीही मदतीला आले नाही. अशावेळी एका बँकेने मात्र आम्हाला मदत केली होती. लॉकडाऊनच्या आधी आमच्या ग्रुप कडून साधारण 400 ते 500 डबे जायचे तेच प्रमाण आता 40 आणि 50 डब्यांवर आल आहे."
एक डबा जातो 3 जणांच्या हाता खालून - या संघटनेचे काम अगदी नियोजनबद्ध चालतं. सकाळी कुठला डबा कुठून घ्यायचा तो किती वाजता कुठे पोहोचवायचा याचं संपूर्ण नियोजन असतं. आज आम्ही एक डबा जुहू येथील सात बंगला परिसरातून घेतला. हा डबा घेण्याचा वेळ आहे नऊ वाजून पंधरा मिनिटाचा. हा डबा साडेदहा वाजेपर्यंत अंधेरी स्टेशनला पोहोचतो. तिथून दुसरी व्यक्ती या डब्याचा ताबा घेते. तिथून 11 :30 वाजेपर्यंत हा डबा सांताक्रुज स्टेशनच्या दिशेने रवाना होतो. या स्टेशन बाहेर तिसरी व्यक्ती या डब्याचा ताबा घेते. ही तिसरी व्यक्ती तो डबा निश्चित स्थळी पोहोचवते आणि हा वेळ होता 12 वाजून 45 मिनिटांचा.
मॅनेजमेंटचे धडे - डबेवाल्यांच्या मॅनेजमेंटला साधारण 130 वर्षांचा इतिहास आहे. सध्या याच मॅनेजमेंटचे धडे देशातील आयआयटी महाविद्यालयांमध्ये तसेच एमबीए महाविद्यालयांमध्ये देखील दिले जात आहेत. इतकच नाही तर सप्लाय मॅनेजमेंटच्या अनेक कंपन्यांमध्ये आज डबेवाल्यांना मार्गदर्शक म्हणून बोलावले जाते. या डबेवाल्यांच्या नावे अनेक पुरस्कार आहेत. त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद झाली आहे.
गेलेले वैभव परत आणायचय - डबेवाला संघटनेचे अध्यक्ष मुके सांगतात की, "आता सर्व काही सुरू होत आहे. त्यामुळे आम्हाला आमचं पूर्वीचे वैभव पुन्हा आणायचं आहे. आधी संपूर्ण मुंबई भरात आमचे दोन लाख डबे जायचे आणि 5 हजार लोक काम करायची. त्यातून आमच्या सहकाऱ्यांना उत्पन्नदेखील चांगलं मिळायचं. मात्र, आता तीच संख्या दहा हजार डब्यांवर आली आहे. आणि फक्त 400 ते 500 सहकारी हे काम करतायत."
आम्ही प्रयत्न करतोय - "पूर्वी प्रमाणे डब्यांची संख्या वाढवण्यासाठी सध्या आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आम्ही आमच्या जुन्या ग्राहकांशी संपर्क साधत आहोत. त्यांना आम्ही पुन्हा एकदा सर्व सुरळीत झालं असून आपली डब्याची लाईन सुरु करावी अशी विनंती करत आहोत. याला सध्या लोकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच त्याचा रिझल्ट दिसेल." असं मुके यांनी म्हटलं आहे.