मुंबई- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दार बंद झाले आहे. फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लोकलच्या फेऱ्या कमी केल्यामुळे गर्दीच्या वेळी लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच याच्या कडक अंमलबजावणीसाठी रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बघूनच प्रवेश देण्यात येत आहे. लोकलच्या फेऱ्या या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू असल्याने, लोकलच्या फेऱ्यांची संख्या घटवण्यात आली आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर दररोज १ हजार ३९२ आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १ हजार ३०० लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी लोकल फेऱ्या कमी असल्याने अनेक लोकल गाड्यांमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असून, गर्दीच्या वेळी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे.
लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी
शासनाने दिलेल्या सूचेनानुसार प्रत्येक रेल्वे स्थानकांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रांगा लावून ओळखपत्र बघूनच प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे या रांगेत मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टंसिगचा फज्जा उडतो आहे. इतकेच नव्हे तर आता गर्दीच्या वेळी लोकल फेऱ्या कमी असल्यामुळे लोकलमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका निर्माण झाला असून, लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच एका लोकलमध्ये केवळ 700 लोकांनाच प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी देखील मागणी होत आहे.
हेही वाचा - मोफत लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समिती ठरवणार, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे संभ्रम