मुंबई - कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. या काळात मुंबईमध्ये मोठ्या गुन्ह्यांत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मे २०२०च्या तुलनेत जून २०२०मध्ये मोठ्या गुन्ह्यांमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे जून महिन्यात घडलेल्या एकूण बलात्काराच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार अधिक घडले आहेत. याच संदर्भात ईटीव्ही भारतचा रिपोर्ट...
आर्थिक राजधानी मुंबईत मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, खंडणी, चोरी बलात्कार, विनयभंगासारख्या मोठ्या गुन्ह्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या अहवालानुसार समोर येत आहे. मे २०२० या महिन्यात मुंबई शहरातील ९४ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत केलेल्या कारवाईत तब्बल २ हजार ५३२ मोठे गुन्हे नोंदवण्यात आले होते. ज्यात तब्बल १ हजार ८२८ प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. मात्र, हेच प्रमाण जून २०२० महिन्यात दुपटीने वाढले असून, यात ५ हजार ७९७ मोठे गुन्हे घडले असून, आतापर्यंत ४ हजार ७९७ गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी लावला आहे.
जून महिन्यात घडलेले मोठे गुन्हे
जून महिन्यात मुंबई शहरात एकूण १३ खुनाचे गुन्हे नोंदवण्यात आले असून, खुनाच्या प्रयत्नाचे २६ गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत. दरोड्याचा एकही गुन्हा मुंबईत जून महिन्यात घडलेला नसून, रॉबरीचे ३३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. खंडणीचे ९ गुन्हे या महिन्यात दाखल झाले असून घरफोडीचे १०५ गुन्हे मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत. चोरी होण्याचे १२६ गुन्हे, वाहन चोरोची २३५ गुन्हे, जखमी करण्याचे ३०२ गुन्हे या काळात मुंबई पोलिसांनी नोंदवले आहेत. मुंबईत १२ दंगलीचे गुन्हे घडले असून, बलात्काराचे ४६ गुन्हे, विनयभंगाचे १०३ तर इतर प्रकरणात ४ हजार ७७७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
अल्पवयीन मुलींवरचे गुन्हे वाढले
मे महिन्यात मुंबईत बलात्करांचे १९ गुन्हे घडले होते. ज्यात १५ अल्पवयीन मुलींवर बलात्काराचा गुन्हा घडला होता. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ४० गुन्हे मे महिन्यात नोंदवण्यात आले होते. मात्र, हेच प्रमाण जून महिन्यात वाढले आहे. जून महिन्यात ४६ बलात्काराच्या गुन्ह्यात २५ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले आहेत. जून महिन्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याच्या ४६ घटना घडल्या आहेत.