मुंबई - राज्यात महाविकास आघाडीची सरकार आल्यापासून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा सामना पाहायला मिळत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करून तुरुंगात देखील टाकले आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीने जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत ईडीचे अधिकारी जितेंद्र नवलानी विविध व्यक्तीच्यासोबत खंडणी गोळा करण्याचे काम करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासाकरिता जितेंद्र नवलानी यांना मुंबई गुन्हे शाखेने समन्स पाठवले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भातील पुरावे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचे राऊतांनी सांगितले होते. या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जितेंद्र नवलानीविरुद्ध प्राथमिक चौकशीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने नवलानी यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जितेंद्र नवलानी आणि संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स आर्थिक गुन्हे शाखेने बजावले आहे. संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत आरोप करताना जितेंद्र नवलानी हे खंडणीचे रॅकेट चालवत असून त्यांचा मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचा आरोप केला होता. संजय राऊतांनी अरविंद भोसले नावाच्या एका व्यक्तीने केलेली तक्रार मुंबई पोलीस आयुक्तांना दिली होती. ज्यात जितेंद्र नवलानीच्या नावाने नोंदणी असलेल्या कंपन्यांमध्ये 2015 ते 2020 या काळात जवळपास 70 फर्म्सनी 59 कोटी रुपये जमा केल्याचे म्हटले आहे.
जितेंद्र नवलानी या फर्म्सच्या मालकांना ईडीच्या कारवाईची आणि अटकेची भीती दाखवत पैसे गोळा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. काही ईडी अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच जितेंद्र नवलानीने हे कृत्य केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले असून ईडी कारवाईनंतर नवलानी यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्यात यायचे. बँक अकाऊंटमध्ये जमा करण्यात आलेल्या 59 कोटींव्यतिरीक्त नवलानी यांना 100 कोटींची रोख रक्कम देण्यात आल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.