मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण हे इमारतीमधील तर १० टक्के रुग्ण हे चाळी आणि इमारतीमधील आहेत. त्यासाठी प्रतिबंधित इमारतींमध्ये उपाययोजना आणखी कठोर केल्या जणार आहेत. गृह विलगीकरणाचे नियम नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. नियम मोडणाऱ्यांची माहिती गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला कळविण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
गुन्हे दाखल करण्याचे निर्देश -
मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ या दोन महिन्यात एकूण २३ हजार २ रुग्ण महानगरपालिका क्षेत्रात आढळले. त्यापैकी सुमारे ९० टक्के रुग्ण हे इमारतींमध्ये राहणारे आहेत. तर उर्वरित म्हणजे सुमारे १० टक्के हे झोपडपट्टी व चाळीतील आहेत. मुंबईत आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी दाट वस्ती आणि झोपडपट्टय़ा यांच्या तुलनेत रहिवासी इमारतीमधील रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिबंधित इमारतीमधील उपाययोजना अतिशय कठोर केल्या जात आहेत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. होम क्वारंटाईनसह कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणा-यांची माहिती संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांनी प्रशासनाला कळवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियम मोडणा-यांवर तात्काळ पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही प्रशासनाने सर्व विभाग कार्यालयाना दिले आहेत.
या करण्यात आल्या सूचना -
ज्या इमारतींमध्ये पाचपेक्षा जास्त बाधित रुग्ण आहेत, अशा सोसायट्यांमध्ये सूचना फलकांवर संबंधित घराचा आणि मजल्याचा क्रमांक दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर असे बाधित रुग्ण तसेच त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती यांच्या हातावर गृह विलगीकरणाचे शिक्के मारलेले असतील. गृह विलगीकरण नियम मोडून असे रुग्ण व त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती घराबाहेर पडले किंवा सार्वजनिकरित्या फिरताना आढळल्यास शेजारील रहिवाशांनी आणि संबंधित सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ महानगरपालिका प्रशासनाला कळवावे. तसेच विभाग कार्यालयांनी अशा नियम मोडणाऱ्यांवर पोलिसात गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. एकाच घरामध्ये बाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती गृह विलगीकरणात राहत असतील तर रुग्ण आणि कुटुंब यांच्यासाठी स्वतंत्र खोली, तसेच स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. अशी व्यवस्था घरी उपलब्ध नसल्यास त्यांना विलगीकरण केंद्रांमध्ये नेण्यात येईल. बाधित रुग्ण संख्या अधिक आढळलेल्या इमारतींमध्ये वावरणारे मोलकरीण, मजूर, वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते, कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. अशा चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. प्रतिबंधित इमारतीमधील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची, त्यांच्यात लक्षणे आढळली नाहीत तरीही, संपर्कात आल्यापासून सातव्या दिवशी चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे जास्तीत जास्त संस्थात्मक अथवा गृह विलगीकरण करून विषाणूंची साखळी तोडण्यावर भर दिला जात आहे. गृह विलगीकरण नियमाचे पालन करत नसलेल्या व्यक्तींना सक्तीने कोरोना काळजी केंद्र १ (सीसीसी 1) मध्ये स्थानांतरीत केले जात आहे. त्यासाठी सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीतील ‘कोरोना काळजी केंद्र’ व्यवस्था पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे -
ज्या इमारतीत पाचपेक्षा कमी रुग्ण आहेत, तिथे संबंधित रुग्ण असलेला मजला प्रतिबंधित (सील) केला जातो. दिनांक ९ मार्च २०२१ रोजी पर्यंतची स्थिती पाहता, मुंबईत एकूण २,७६२ मजले प्रतिबंधित (सील) करण्यात आले आहेत. ह्या सर्व मजल्यांमध्ये मिळून ४ हजार १८३ रुग्ण आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण असल्यास संपूर्ण इमारत प्रतिबंधित केली जाते. दिनांक ९ मार्च २०२१ रोजीच्या स्थिती नुसार मुंबईत अश्या २१४ इमारती आहेत. प्रतिबंधित मजले तसेच इमारती मधील बाधित रुग्ण, त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती, तसेच सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. ‘कोविड-१९’ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.