मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मोफत दिल्या ( Mumbai corporation school ) जातात. यंदा शालेय वस्तू पैकी रेनकोट व स्टेशनरीचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, वस्तू व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले नव्हते. यावरून पालिकेवर भाजपकडून टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता येत्या आठवडाभरात गणवेश विद्यार्थ्यांना दिला जाणार ( corporation school students will get uniforms ) आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.
नवीन रंगाचा गणवेश - आरोग्य आणि शिक्षण देणे हे पालिकेचे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून बंधनकारक कर्तव्य आहे. पालिकेतील शाळांमधील विद्यार्थी गरीब घरातील असल्याने त्यांना २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा २००९ मध्ये गणवेश बदलला होता. पण, त्यानंतर गेली अनेक वर्षे मुंबई महानगरपालिकेने गणवेशात कोणताही बदल केला नव्हता. मुंबई महापालिकेच्या पायाभूत सुविधांसाठी होणारी भक्कम तरतूद पाहता शाळांना आकर्षक अशी रंगसंगती दिली जात आहे. त्यानुसारच आता शाळांमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही नवीन रंगाचा गणवेश येत्या आठवड्यात शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणार असल्याची माहिती कुंभार यांनी दिली.
१३ वर्षांनंतर नव्या रंगाचा गणवेश - मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या विद्यार्थांसाठी २००९ मध्ये निश्चित केलेला गणवेश हा निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा आहे. त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी नवा गणवेश मिळणार आहे. यावेळी क्रीम रंगाची ट्राऊजर आणि चॉकलेटी रंगाचा शर्ट अशा रंगसंगतीचा गणवेश यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये काही विशिष्ट डिझाईन गणवेशासाठी निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे तब्बल १३ वर्षांनंतर नव्या रंगाचा गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या २७ शालेय वस्तुंपैकी हा गणवेश दिला जाणार आहे. त्यामुळे शाळा सुरु होऊनही मागील महिनाभरापासून मुलांची गणवेशासाठी असलेली प्रतीक्षा आता संपणार आहे.
हेही वाचा - Shivsena : शिवसेनेची 'धनुष्यबाणा'बाबत निवडणूक आयोगाकडे धाव; 'आमची बाजू ऐकून घ्यावी, मगच...'