मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० रुग्ण आढळून आले होते. गुरुवारी त्याचा रेकॉर्ड ( Mumbai Corona Update on 6th jan 2022 ) तोडत २० हजार १८१ रुग्णांची नोंद झाली ( Corona Patients In Mumbai ) आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ७९ हजार २६० वर पोहोचली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांचे व आरोग्य विभागाचे ताण वाढले आहे.
७९ हजार २६० सक्रिय रुग्ण -
मुंबईत आज ( ६ जानेवारी ) २० हजार १८१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४ मृत्यूची नोंद झाली आहे. आज २ हजार ७३७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख ५३ हजार ८०९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५५ हजार ५६३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ३८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ७९ हजार २६० सक्रिय रुग्ण ( Corona Active Cases in Mumbai ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७० दिवस इतका आहे. मुंबईमधील ५०२ इमारती आणि ३२ झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. ३० डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.९९ टक्के इतका आहे.
८३.६ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या २० हजार १८१ रुग्णांपैकी १७ हजार १५४ म्हणजेच ८५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १ हजार १७० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १०६ रुग्णांना ऑक्सिजन बेडची ( Oxygen Beds ) आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३५ हजार ५९४ बेड्स असून त्यापैकी ५ हजार ९९८ बेडवर म्हणजेच १६.८ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८३.२ टक्के बेड रिक्त आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १ हजार ३७७, २९ डिसेंबरला २ हजार ५१०, ३० डिसेंबर ३ हजार ६७१, ३१ डिसेंबरला ५ हजार ६३१, १ जानेवारीला ६ हजार ३४७, २ जानेवारीला ८ हजार ६३, ३ जानेवारीला ८ हजार ८२, ४ जानेवारीला १० हजार ८६०, ५ जानेवारीला १५ हजार १६६, ६ जानेवारीला २० हजार १८१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
धारावीत १०७ नवे रुग्ण -
मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. या झोपडपट्टीत दाटीवाटीने लोक राहत असल्याने गेल्यावर्षी धारावी कोरोनाची हॉटस्पॉट झाली होती. गेल्या वर्षी पहिल्या लाटेदरम्यान धारावीत दिवसाला ७० हुन अधिक रुग्णांची नोंद झाली होती. ८ एप्रिलला दुसऱ्या लाटेत सर्वाधिक ९९ रुग्णांची नोंद झाली होती. याआधी १८ मे रोजी सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने धारावीत गेले काही महिने १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. कित्तेकवेळा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, आता मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने धारावीतही रुग्ण वाढू लागले आहे. गेल्या २४ तासात धारावीत १०७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज धारावीत गेल्या पावणे दोन वर्षातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत एकूण ७ हजार ६३६ रुग्ण असून ६ हजार ७६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ४४४ सक्रिय रुग्ण आहेत.
जनतेने सर्व नियमांचे पालन करावे
आज मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजार पेक्षा अधिक आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र, रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णालयात बेड्स शिल्लक आहेत. ऑक्सिजनची मागणीही वाढली नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचेही मंत्री टोपे म्हणाले. राज्यात अधिक निर्बंध लागू करायचे नसतील तर जनतेने सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. नवी मुंबई येथील बीएसव्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे वक्तव्य केले.
हे ही वाचा - Mumbai High Court : 'सार्वजनिक सुट्टी नागरिकांचा कायदेशीर अधिकार नाही'