मुंबई - राज्यातील काँग्रेसची स्थिती, मुंबई पालिका निवडणुकीची तयारी, राहुल गांधी यांची सभा, काँग्रेसमधील गटबाजी अशा अनेक विषयांवर 'ई टीव्ही भारत'ने मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Mumbai Congress President Bhai Jagtap) यांच्यासोबत संवाद साधला.
- प्रश्न - काँग्रेसच्या 137 वा वर्धापन दिनासाठी तयारी काय? तसेच राहुल गांधी यांचा मेळावा रद्द का झाला?
उत्तर - मुंबईत आणि देशात ओमोक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला आहे. मेळाव्यासाठी आम्ही तयारी केली होती त्यावेळीं कोरोनाचा प्रभाव कमी होता. डिसेंबरच्या पाच तारखेनंतर मुंबईत आणि राज्यामध्ये ओमायक्रॉनचे प्रमाण वाढले. आज रुग्णांची संख्या 20 वर पोहचली आहे. हा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही गेल्या वर्षी कोरोनाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे तेजपाल हॉलमध्ये साध्या पद्धतीने साजरा केला त्याच प्रकारे यावर्षी केला जाणार आहे.
- प्रश्न - आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला नेहमी डावलले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो?
उत्तर - विरोधकांचे कामच आरोप करणे. यावर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस देखील साध्या पद्धतीने साजरा झाला. तर महापरिनिर्वाण दिन देखील साध्या पद्धतीने करण्यात आला. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीकोनातून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.
- प्रश्न - मुंबई अध्यक्ष म्हणून मागील वर्ष कसे आव्हानात्मक होते?
उत्तर -कोणतेही पद चॅलेंजिंग असतं. त्यात मुंबई काँग्रेस अध्यक्षपदही खूप चॅलेंजिंग आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप मोठा होता. या वर्षभरात काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून सामान्य माणसाच्या मदतीला धावला होता. धारावीत काँग्रेसचा कार्यकर्ते जाऊन रुग्णांची मदत केली. वर्षा गायकवाड मंत्री असून देखील रस्त्यावर उतरून लोकांना मदत करत होत्या. रेशन पुरवणे, जेवण पुरवणे ह्या गोष्टी काँग्रेसने केल्या.
- प्रश्न - मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी तोडण्यात यश आलं का?
उत्तर - मोठी संघटना असते तिथे मतभेद असतात. मात्र, राहुलजी यांची सभा म्हंटल्यावर सर्वच कार्यकर्ते त्या कामासाठी तुटून पडले. काही मतभेद नक्कीच होते. मात्र काँग्रेसमध्ये लोकशाही आहे गट असले तरी काँग्रेस एकच आहे.
- प्रश्न - विरोधकांनी नेहमीच संविधानिक काम केले असा आरोप करण्यात येतो?
उत्तर - विरोधकांनी नेहमीच दुहेरीपणा केला. राहुल गांधी यांची सभा कशी होते म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या सभा कशा होऊ देतात. विधानसभेत 12 आमदारांनी जो गोंधळ घातला? आपल्याकडे सत्ता आहे आपण काही करू शकतो असा अविर्भाव विरोधकांचा आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे आभार आहेत. पुढील सुनावणी त्याबाबत स्पष्ट आता येईल.
- प्रश्न - महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी
उत्तर - आम्हाला पूर्णच्या पूर्ण मुंबईत काँग्रेस म्हणून लढायचे आहे. काँग्रेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार. गेल्या वर्षभरात आम्ही मुंबईमध्ये बऱ्यापैकी काम केले. म्हणून मुंबईची जनता काँग्रेसला कौल देईल असा विश्वास आहे.