मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात आणि दवाखान्यात स्वस्त व चांगले उपचार होत असल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पालिकेचे दवाखाने सायंकाळी बंद असल्याने मोठ्या रुग्णालयाकडे धाव घेतली जात असल्याने मोठ्या रुग्णालयावरील भार वाढतो. मोठ्या रुग्णालयांवरील भार कमी करता यावा म्हणून पालिकेचे १५ महत्त्वाचे दवाखाने दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्तावाला सोमवारी स्थायी समतीची मंजुरी मिळाली.
पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत एकूण १८६ दवाखाने कार्यरत असून या दवाखान्यांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रुग्णांना आरोग्य सेवा दिली जाते. या सेवेचा लाभ हजारो रुग्ण घेत असले, तरी बहुतांशी सर्वच शासकीय आणि खासगी कार्यालयांच्या कामकाजाच्या वेळा असल्याने संबंधित ठिकाणी काम करणार्या नोकरवर्गाला पालिकेच्या या आरोग्य सेवेचा लाभ घेता येत नाही. शिवाय सायंकाळी दवाखाने बंद असल्याने औषधांकरिता रुग्णांना बराच वेळ दवाखान्यात थांबावे लागते. तसेच ठराविक सेवेत हे दवाखाने सुरू असल्यामुळे या वेळेत रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढते. परिणामी केवळ ठराविक वेळेमुळे पालिकेच्या रुग्णसेवेचा लाभ घेऊ शकत नसणार्या गोरगरीबांना खासगी रुग्णालयांत महागडे उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे पालिकेचे दवाखाने दुपारी ४ ते रात्रो ११ या वेळेत सुरू ठेवावे अशी मागणी केली जात होती.
हेही वाचा - पंकजा मुंडेंचे पुन्हा एक ट्विट, सहकाऱ्यांना घातली भावनीक साद, म्हणाल्या...
या पार्श्वभूमीवर पालिकेच्या एकूण १८६ पैकी सध्या १५ दवाखाने दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत खासगी पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहेत. दुपारी ४ ते रात्री ११ या वेळेत खासगी पद्धतीने दवाखाने चालवण्यासाठी मे. रुबी अलकेअर सर्व्हिसेस लि. कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. दोन वर्षांच्या कामाकरिता वैद्यकीय अधिकार्यांना प्रतिमहा ६० हजार रुपये तर बहुउद्देशीय कामगारांना प्रतिमहा १७,५०० रुपये मानधन देण्यात येणार आहे. या दवाखान्यांमध्ये दोन वर्षांसाठी १५ वैद्यकीय अधिकारी व १५ बहुउद्देशीय कामगारांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली जाणार आहे. दोन वर्षांचा एकूण खर्च दोन कोटी ७९ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव आज स्थायी समितीत मंजुर करण्यात आला. पालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर हे दवाखाने सुरु केल्यावर या दवाखान्यात मुंबईकरांवर रात्रीही उपचार केले जातील.
हेही वाचा - लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर, विधेयकाच्या बाजूने 311 मतं
दवाखान्यांची नावे -
- ए विभाग - कुलाबा म्युनिसिपल दवाखाना
- बी विभाग - वालपाखाडी दवाखाना
- डी विभाग - बाने कंपाऊंड दवाखाना
- ई विभाग - साऊटर स्ट्रीट दवाखाना
- एफ/नॉर्थ - रावळी कॅम्प, वडाळा दवाखाना
- जी/साऊथ - बीडीडी चाळ दवाखाना
- एच/ईस्ट - कलिना दवाखाना
- एच/वेस्ट - ओल्ड खार दवाखाना
- के/वेस्ट - एन. जे. वाडिया दवाखाना
- पी/नॉर्थ - चौक्सी दवाखाना
- आर सेंट्रल - गोराई म्हाडा दवाखाना
- एल विभाग - चुनाभट्टी दवाखाना
- एन विभाग - रमाबाई आंबेडकर दवाखाना
- एस विभाग - कांजूर व्हिलेज दवाखाना