मुंबई - जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर सुरक्षित अंतर ठेऊनच नियंत्रण मिळवता येणार आहे. मात्र, शहरात बेस्टची संख्या कमी असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे.
सध्या सर्वत्र लॉकडाऊन असले, तरीही अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शहरात बससेवा सुरू आहे. मात्र, या बसेसची संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.
मुंबईत कोरोनाचे आतापर्यंत 306 रुग्ण आढळले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, महाराष्ट्रात 537 रुग्ण असून 26 जणांचा मृत्यू झालाय. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. सध्या सर्वत्र अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येत आहेत. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या वाहतुकीसाठी बेस्ट सेवा अद्याप सुरू आहे. मात्र, बसेस वेळेवर येत नसल्याने तसेच संख्येने कमी असल्याने बसमध्ये गर्दीत कर्मचाऱ्यांना प्रवास करावा लागतोय. यामुळे नागरिकांना एक मीटरचे सुरक्षित अंतर ठेवण्यात अडचणी येत आहेत. यामुळे अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाचा कोरोनाची लागण होण्याची भीती आहे.
अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने विशेष सेवा सुरू केली आहे. परंतु संबंधित सेवा देताना दोन प्रवाशांमध्ये अंतर ठेवणे, उभ्याने प्रवास टाळणे, अशा नियमांचे पालन होत नाही. त्यातच बस वेळेवर येत नसल्याने या कर्मचाऱ्यांना गर्दीमधून प्रवास करावा लागत आहे.