मुंबई - गोरेगाव येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये विसाव्या आयएएपीआय 'अम्युझमेंट एक्स्पो २०२०' या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला. बाजारपेठेतील सर्वात मोठ्या असणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन अमेंडा थॉम्सन ओबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंडियन असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्स अॅन्ड इंडस्ट्रीज (आयएएपीआय)चे अध्यक्ष सोहनसिंग जडेजा, एन. डी. राणा, अजोय रुईया, जोस पनोसे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात आयएएपीआयचे हॅन्ड बुक आणि मॅग्झिनचे प्रकाशन झाले.
अम्युझमेंट पार्क्स म्हणजे केवळ राईड्स आणि आनंददायी खेळ नव्हे, तर ते सर्वाधिक भेट दिले जाणारे ठिकाण असल्याचे आयएएपीआयचे अध्यक्ष सोहनसिंग जडेजा यांनी सांगितले. हे पार्क एका प्रकारच्या रिटेल आऊटलेट्स सोबतच गुणवत्तापूर्ण राहणीमान देणारे पर्यटनस्थळ बनत आहेत, असे ते म्हणाले. तसेच येणाऱ्या दशकांमध्ये पूर्वीच्या तुलनेत ही बाजारपेठ दुप्पटीने वाढण्याची अपेक्षा जडेजा यांनी वर्तवली.
असोसिएशन ऑफ अम्युझमेंट पार्क्स अॅन्ड अॅट्रॅक्शन्स (आयएएपीए) च्या पहिल्या महिला अध्यक्ष अमेंडा थॉम्सन ओबे यांनी भारताने अम्युझमेंट क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे कौतुक केले आहे. तसेच सर्व घटकांनी हे क्षेत्र वाढण्यासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
भारतात १६० हून अधिक अम्युझमेंट पार्क्स असून भविष्यात शहरापासून दूरच्या ठिकाणी रिसॉर्ट्स आणि हॉटेल्ससह या प्रकारच्या पर्यटन स्थळांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भारतातील अम्युझमेंट पार्क्सना दरवर्षी तीन कोटी लोक भेट देतात. तरूण मुले तसेच परिवारासोबत येण्याची संख्या एकूण भेट देणाऱ्यांच्या ५० टक्के आहे. तर यामध्ये वयस्क व्यक्तींची संख्या देखील ५० टक्के आहे. त्याचसोबत मॉल्समध्ये देखील इनडोअर अम्युझमेंट सेंटर्समुळे (आयएसीज) विक्रीत वाढ होत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅमिली एन्टरटेन्मेंट सेंटर्स, डेस्टिनेशन एक्स्पिरियन्सेस, आदींचा समावेश आहे. आयएएपीआय ही गैरसरकारी, ना नफा- ना तोटा तत्वावर चालणारी संस्था आहे.
१९९९ मध्ये स्थापन झालेली आयएएपीआय ही भारतातील आघाडीच्या व्यावसायिक संस्थांपैकी एक असून त्याचे ४४५ सदस्य आहेत. हे सर्व खासगी क्षेत्रातील छोटे व मध्यम व्यवसायिक आहेत.