मुंबई - मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आज गणेशोत्सवामधील विसर्जन मिरवणुकीमध्ये कर्कश्श आवाजात गाणे वाजवल्या मुळे ध्वनिप्रदूषण झाल्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींना सबळ पुरावे नसल्याने आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या दोन्ही आरोपींविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सप्टेंबर 2009 मध्ये गुन्हा दाखल - भांडुप पूर्वेकडील एका विसर्जन मिरवणुकीत ट्रकवर ध्वनिक्षेपक लावून मिरवणुकीत सहभागी झालेल्या दोघांविरोधात पोलिसांनी सप्टेंबर 2009 मध्ये गुन्हा दाखल केला होता. या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची पातळी 127 डेसिबल होती. सर्वसाधारणपणे ही मर्यादा सुमारे 95.5 डेसिबल असायला हवी. त्यामुळे त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 15 नुसार ध्वनिप्रदूषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
मोजणी करताना गोंधळ होण्याची शक्यता - अभियोग पक्षाने चार साक्षीदारांची जबानी नोंदवली होती. हे सर्व पोलीस कर्मचारी असून त्यांनी ध्वनी पातळी मोजली होती. मात्र, विसर्जन दिवशी संध्याकाळी अनेक मंडळांच्या मिरवणुका एकापाठोपाठ एक सुरू होत्या. त्यामुळे आरोपींच्या ध्वनी पातळीबाबत संभ्रम निर्माण होतो यामध्ये अन्य मंडळांच्या ध्वनिप्रदूषणाची मोजणी देखील झाली असावी असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच यादिवशी हजारो लोक रस्त्यावर उभे असतात. अशा वेळी मोजणी करताना गोंधळ होण्याची शक्यता आहे असे मत न्यायालयाने व्यक्त केले आणि आरोपींची निर्दोष मुक्तता केली.