मुंबई - एनडीएमधूनबाहेर पडल्यानंतर शिवसेना यूपीएमध्ये सामील होणार का, यावर सध्या चर्चा सुरू आहे. बुधवारी (दि. 8) शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांची भेट घेतली या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. भविष्यात काँग्रेस आणि शिवसेना आगामी उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुका एकत्र लढवू शकते, असे संकेतही राऊत यांनी दिले आहेत.
दिल्लीत शिवसेनेचा चेहरा असलेले संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर बुधवारी (दि. 8) काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली. तासभर झालेल्या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्रात काय करता येईल, याबाबत चर्चा झाल्याचे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
... यामुळे काँग्रेसचे गोवा निवडणुकीकडे विशेष लक्ष
भारतीय जनता पक्षाने मागील गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या तोंडातील घास काढून घेतला होता. जास्त आमदार असूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नव्हती. यामुळे कॉंग्रेसने यावेळी गोव्याकडे विशेष लक्ष केंद्रित केला आहे. आगामी काळात उत्तर प्रदेश व गोवामध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. आता शिवसेनेकडूनही या निवडणुकांसाठी काँग्रेसशी हातमिळणी करण्याचे संकेत देण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत.
प्रियांका गांधी व खासदार संजय राऊत यांच्या बैठकीनंतर युपीएत सहभागी होणार का, असे त्यांना विचारले असता याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतली, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा - Goa Election : गोवा काँग्रेसचे 2 आमदार लवकरच भाजपात येणार - देवेंद्र फडणवीस