मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा महागाईच्या प्रश्नावर केंद्र सरकार विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवले आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यावरून जो मुद्दा उपस्थित केला त्याचा फटका महाराष्ट्रात हिंदूंना बसला आहे असेही राऊत म्हणाले. मुंबईत आपल्या निवासस्थानी ते बोलत होते.
भोंग्याचा फटका महाराष्ट्रातील हिंदूंना! - संजय राऊत म्हणाले, की कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात काम सुरू आहे. महाराष्ट्र शांतता आहे. कुठेही भांडण नाही, कुठेही संघर्ष नाही. सर्व व्यवस्थित सुरू असताना काही लोकांनी वातावरण बिघडवण्याचे काम केलं. परंतु महाराष्ट्रातील जनतेने, सर्व धर्माच्या लोकांनी त्याला हवं तसं उत्तर दिलं आहे, असं सांगत त्यांनी भोंग्याच्या विषयावरून राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. भोंग्याबाबत देशामध्ये एक नीती असायला हवी. राजकीय भोंगे आता बंद झाले आहेत असं सांगत, लाऊडस्पीकर हा मुद्दा आता महाराष्ट्रात राहिलेला नाही, असेही राऊत म्हणाले. काही लोकांनी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर हिंदू-मुस्लीममध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा मुद्दाच आता उरला नाही. राज्यात ज्या पद्धतीने गृहमंत्र्यांनी सांगितले आहे, तेच आम्ही सांगत आहोत की यासंदर्भामध्ये राष्ट्रीय धोरण तयार करायला हवे व संपूर्ण देशात सर्व जाती धर्माला एकच निती हवी. भोंग्याचा विषय काढून त्याचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्रामध्ये हिंदूंना विशेष करून भजन कीर्तन करणाऱ्या लोकांना बसला आहे, असेही संजय राऊत म्हणाले. हिंदू समाजामध्ये काही लोकांनी फूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्यातील जनता सुजाण असून त्यांनी याला सडेतोड उत्तर दिले, असे सांगत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोमणा लगावला आहे.
हेही वाचा - Cylinder Prices Increased : घरगुती सिलेंडरचे दर वाढले; किंमत पोचली 1 हजाराच्या टप्यात
जनता महागाईशी लढत आहे - संजय राऊत पुढे म्हणाले की, देशात, राज्यात आज महागाई दिवसेंदिवस वाढत आहे परंतु या महागाईवर बोलायला कोणीही तयार नाही आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाऊन आले. त्यांना युक्रेन व रशियामध्ये युद्ध चालू आहे त्याची चिंता आहे. त्यात ते मध्यस्थी करत आहेत. परंतु या देशातील जनता महागाई विरुद्ध लढत आहे, याकडे त्यांचे लक्ष नाही. पेट्रोल, डिझेल, सिलेंडर या संदर्भात कोणीच बोलत नाही आहे. भोंग्यावर तुम्ही कसले बोलता, सरकार म्हणून तुम्ही अन्न, वस्त्र, निवारा, महागाई याच्यावर बोला असं सांगत भोंग्यावर बोलणं हे तुमचं काम नाही, असेही संजय राऊत म्हणाले.