मुंबई - शिवसेना नेते आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या भवितव्य यावर अवलंबून असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दिल्ली दौरा मंगळवार (दि. 21 जून) रद्द करण्यात आला आहे. आजच्या सर्व घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे सतरा आमदार नॉट रीचेबल आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील महत्त्वाचा नेता मानला जातो. शिवसेनेवर त्यांची मोठी छाप आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची नाराजी शिवसेनेला भोवण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकार वाचवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवार, मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तातडीची बैठक होणार आहे. शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.