मुंबई - आझाद मैदान येथे आंदोलनास बसलेल्या मराठा समाजातील युवकांची खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी भेट घेऊन पुढील आंदोलनाबाबत चर्चा केली. मी येथे राजकीय उद्देशाने आलो नसून छत्रपतींचा वंशज म्हणून आलो असल्याचे सांगत सरकार मुख्यमंत्री चालवतात की अधिकारी, अशा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
गेल्या 35 दिवसांपासून आझाद मैदानावर 3 हजार 500 मराठा तरुण हे नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनास बसले आहेत. हा विषय गढूळ होऊ नये म्हणून मी महिनाभर आलो नव्हतो, मात्र आता पर्याय न उरल्याने मला यावे लागले, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
राज्यात सुरुवातीला जे आरक्षण दिलं त्यावेळी १६ टक्के आरक्षणामधून ३ हजार ५०० हजार तरुणांना नोकरींसाठी कॉल आले, पण त्यांना काम मिळाले नाही. आत्ता त्यांना न्याय कुणी द्यायचा? हे सरकार कोण चालवते, मुख्यमंत्री की अधिकारी? असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे. या संदर्भात सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
भाजप सरकारने राज्यात मराठा आरक्षण लागू केल्यानंतर या विरोधात विविध याचिका दाखल झाल्या होत्या. यावर सुनावणी होत शेवटी मराठा आरक्षण कायदेशीर असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर राज्यातील 55 सरकारी विभागात नोकरभरती सुरू झाली. मात्र, गेले 7 महिने नियुक्ती पत्र न मिळाल्याने या युवकांनी आझाद मैदानावर आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे.