मुंबई - गेली अडीच महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वेची लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांच्या मासिक पासचे पैसे वाया गेले आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना त्यांच्या मासिक तिमाही, सहामाही पासचे पैसे परत द्यावेत किंवा त्याला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी पत्राद्वारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
उपनगरीय रेल्वेने मोठ्या संख्येने मध्यमवर्गीय प्रवासी प्रवास करतात. त्यातील लाखोंच्या संख्येने प्रवासी हे तिमाही, सहामाही आणि वार्षिक पास काढत असतात. लॉकडाऊनमुळे आधीच मध्यमवर्गीय नागरिकांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे या सामान्य, मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून रेल्वेने उपनगरीय व मुंबई महानगर परिसरातील मार्च महिन्यापासून प्रवास न केलेल्या प्रवाशांचे पासचे पैसे परत द्यावे किंवा त्या पासला मुदतवाढ द्यावी, असे अनिल देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, लॉकडाऊननंतर आता ‘अनलॉक’ सुरू झाले असले तरी राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.