मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. 23 फेब्रुवारीपर्यंत मुंबईत 1 लाख 99 हजार 912 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 1 लाख 86 हजार 158 आरोग्य कर्मचारी तर 13 हजार 754 फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश आहे. मुंबईत सर्वाधिक लसीकरण पालिकेच्या नायर, केईएम, बिकेसी जम्बो सेंटर आणि राजावाडी रुग्णालयात झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
याठिकाणी सर्वाधिक लसीकरण
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मोहीम स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात सर्वाधिक म्हणजेच 22 हजार 706 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्या खालोखाल परळ येथील केईएम रुग्णालयात 20 हजार 928, घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमध्ये 17 हजार 504, कांदिवली येथील डॉ. आंबेडकर हॉस्पिटल म्हणजेच शताब्दी रुग्णालयात 16 हजार 857, अंधेरी येथील सेव्हन हिल रुग्णालयात 11 हजार 888, विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात 11 हजार 823 लाभार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत काल बुधवारी 34 लसीकरण केंद्रांवर 108 बूथवर 5000 आरोग्य कर्मचारी तर 5800 फ्रंटलाइन वर्कर अशा एकूण 11, 800 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा 91 टक्के म्हणजेच 9 हजार 830 लसीकरण करण्यात आले. त्यातील 6 हजार 481 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 369 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाचा 9 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला. आतापर्यंत 1 लाख 86 हजार 158 लाभार्थ्यांना पहिला तर 13 हजार 754 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1 लाख 99 हजार 912 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
उद्दिष्टापेक्षा अधिक लसीकरण
मुंबईत लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली. लसीकरणाच्या सुरुवातीपासून लसीकरणाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र गेल्या काही दिवसात चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 19 फेब्रुवारीला 128 टक्के, 20 फेब्रुवारीला 133 टक्के, 22 फेब्रुवारीला 93 टक्के, 23 फेब्रुवारीला 88 टक्के तर 24 फेब्रुवारीला 91 टक्के लसीकरण झाले आहे. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करू, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला आहे.
ॲपमुळे लसीकरण याचा वेग मंदावतोय
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण सुरू आहे. मात्र कोविन ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणाचा वेग काहीसा मंदावतो आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी वेळोवेळी राज्य आणि केंद्र शासनाला कळविण्यात आले आहे. राज्य शासन लवकरच नवीन ॲपमधील अडचणींसंदर्भात केंद्र सरकारशी संपर्क साधून यावर तोडगा काढेल अशी माहिती काकाणी यांनी दिली.
कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण?
- कामा हॉस्पिटल 1817
- जसलोक हॉस्पिटल 210
- एच. एन. रिलायन्स 413
- सैफी रुग्णालय 236
- ब्रीच कँडी हॉस्पिटल 196
- भाटिया हॉस्पिटल 23
- कस्तुरबा हॉस्पिटल 4629
- नायर हॉस्पिटल 22706
- जेजे हॉस्पिटल 1419
- ओक्हार्ड हॉस्पिटल 6
- केईएम 20928
- सायन हॉस्पिटल 9696
- हिंदुजा हॉस्पिटल 23
- व्ही. एन. देसाई 2886
- बिकेसी जंबो 20060
- बांद्रा भाभा 7035
- लिलावती हॉस्पिटल 46
- सेव्हन हिल हॉस्पिटल 11888
- कूपर हॉस्पिटल 11823
- नानावटी हॉस्पिटल 109
- कोकिलाबेन हॉस्पिटल 91
- गोरेगाव नेस्को 7215
- एस के पाटील 2373
- एम. डब्लू. देसाई हॉस्पिटल 1362
- डॉ. आंबेडकर हॉस्पिटल 16857
- दहिसर जंबो 2977
- भगवती हॉस्पिटल 1935
- कुर्ला भाभा 1954
- सॅनिटरी गोवंडी 3657
- बीएआरसी 917
- माँ हॉस्पिटल 3612
- राजावाडी हॉस्पिटल 17504
- एल. एच. हिरानंदानी 37
- वीर सावरकर 2887
- मुलुंड जंबो 6523
- फोर्टीस मुलुंड 34