मुंबई : वर्षभरातील सर्व सणांनंतर आता नाताळवरही कोरोनाचा परिणाम दिसून आला. मुंबईतील बहुतांश चर्चमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा केला जातो, मात्र यावर्षी कोरोनामुळे असे काही दिसून आले नाही. कित्येक चर्चमध्ये नाताळनिमित्ताने मिडनाईट प्रेअर पार पडली, मात्र लोकांना या प्रेअरसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.
आधीच कोरोना, त्यात संचारबंदी..
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील महापालिका क्षेत्रांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळेदेखील नाताळच्या उत्सवावर परिणाम दिसून आला. दरवर्षी रात्री १२च्या सुमारास मोठ्या प्रमाणात लोक चर्चमध्ये गोळा होऊन ख्रिसमस साजरा करतात. मात्र, आता रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत शहरात संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे लोकांना आपापल्या घरी राहूनच नाताळ साजरा करावा लागणार आहे.
चर्चेसमध्ये केवळ रोषणाई; लोक मात्र घरीच..
नाताळच्या निमित्ताने चर्चेसमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आपल्याला पहायला मिळाली. मोठ्या चर्चमध्ये रात्री नाताळ साजरा करण्यासाठी ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, या ५० लोकांमध्ये कोणाकोणाला सहभागी करायचे, शिवाय आपली निवड झाली नाही म्हणून लोकांना वाईट वाटू नये यासाठी बहुतांश चर्चेसनी परवानगी मिळूनही रात्री नाताळ साजरा करायचा नाही अशी भूमीका घेतलेली पहायला मिळाली.
साधेपणाने नाताळ साजरा करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन..
नाताळनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून सर्वांनी येशू ख्रिस्तांच्या प्रेम, करूणा आणि क्षमा या तत्वांचे आचरण करायला हवे असे म्हटले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करावा, कोरानासंदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
गृहमंत्रालयाची नियमावली..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, चर्च प्रशासनाला सोशल डिस्टन्सिंग आणि चर्चमध्ये गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. यावर्षी स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सार्वजनिक प्रार्थनेसाठी केवळ 50 जणांनाच एकत्रित येण्याची परवानगी देण्यात आली आहे. याच बरोबर चर्च प्रशासनाला परिसराचे नियमितपणे सॅनिटायझेशनदेखील करावे लागेल. याशिवाय चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांत, 60 वर्षांवरील नागरिक आणि 10 वर्षांखाली मुलांनी चर्चमध्ये जाणे अथवा घराबाहेर पडणे टाळावे, याऐवजी त्यांनी घरातच सण साजरा करावा. याच बरोबर, गर्दी होईल, असे देखावे अथवा आतिषबाजी करू नये. तसेच 31 डिसेंबरला आभारप्रदर्शनासाठीचे मास आयोजित करताना वेळेचे निर्बंध पाळवेत आणि मध्यरात्रीऐवजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारासच याचे आयोजन करावे, असे म्हणण्यात आले आहे. याशिवाय चर्चमध्ये प्रभू येशूचे स्तुतीगीत गाण्यासाठी 10हून अधिक व्यक्तींचा सहभाग नसावा. तसेच यावेळी माईक स्वच्छ असण्यासंदर्भातही काळजी घ्यावी, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.