मुंबई - भारतीय रेल्वेचे जाळे देशभर पसरले आहे, त्याच मध्य रेल्वेचा आवाका सर्वाधिक जास्त असल्याने फुकट्या प्रवाशांचा फटका मध्य रेल्वेला (Central Railway) बसताना दिसतो आहे. मात्र, या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करू मध्य रेल्वेने एप्रिल- 2021 ते मार्च-2022 या आर्थिक वर्षात 214 कोटी 41 लाख रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
27 तिकिट तपासणी कर्मचाऱ्यांना पुरस्कृत
विनातिकिट प्रवाशांना पकडण्यासाठी तिकिट तपासनीस पथक स्थानकात, ट्रेनमध्ये आणि रेल्वे परिसरात तैनात केलेले असते. तिकिट तपासनीसांमुळे रेल्वेच्या तिजोरींत कोट्यवधीं रुपयांचा महसूल गोळा होतो. एप्रिल-2021 ते मार्च-2022 या आर्थिक वर्षात सर्वाधिक विना तिकिट प्रवाशांना पकडणाऱ्या आणि जास्त महसूल गोळा करून देणाऱ्या तिकिट कर्मचाऱ्यांचा मध्य रेल्वे प्रशासनाने सत्कार केला. संपूर्ण मध्य रेल्वेमधील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 27 तिकिट तपासणी कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. एप्रिल- 2021 ते मार्च-2022 या कालावधीत मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचार्यांनी 35.39 लाख प्रकरणे शोधून काढली. याद्वारे सुमारे 214.41 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.
वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन-
उपनगरी गाड्यांमध्ये आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहीमेदरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टमद्वारे तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे अशा अनियमितता प्रामुख्याने लक्षात आल्या. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे करीत आहे.
हेही वाचा - Railway T maestro app : आपत्कालीन अपघातांसाठी रेल्वेचे टी-माइस्ट्रो अॅप