मुंबई - शहर व उपनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. परिणामी कोरोना रुग्ण आढळून आलेले विभाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले जात आहेत. तर कित्येक इमारती सील केल्या जात आहेत. मात्र, अशाच सील करण्यात आलेल्या इमारतीच्या संख्येत गेल्या महिनाभरात तिप्पट वाढ झाली आहे. त्यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनचे नियम कडक करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. तसेच इमारतीच्या आवारात लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जाते का याची पाहणी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना करावी, असे आदेश पालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.
कोरोना रुग्ण आढळलेल्या सिल इमारतींच्या संख्येत महिनाभरात तिपटीने वाढ मुंबईत कोरोनाचे रोज हजाराहून रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्या विभागात निर्जंतुकीकरण करून रुग्णाला त्याच्या नातेवाईकांना क्वॉरंटाईन किंवा रुग्णाला रुग्णालयात उपचार करण्यासाठी भरती केले जाते. १७ मे रोजीच्या आकडेवारीनुसार मुंबईत कोरोना रुग्ण आढळलेले २८०१ विभाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. एकाच परिसरातील एकापेक्षा अधिक इमारतींना किंवा भागांना 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित केल्यामुळे पोलीस व महापालिकेच्या मनुष्यबळाचे नीट व्यवस्थापन करण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार 'कंटेनमेंट झोन' सोबत 'सीलबंद इमारती' ही आणखी एक वर्गवारी केली. तसेच 'कंटेनमेंट झोन'ची पुनर्रचनाही करण्यात आली.
कोरोनाबाधित रुग्ण असलेली सील इमारत मुंबई महापालिकेच्या नव्या व्याख्येनुसार १७ मे रोजी मुंबईत झोपडपट्टी आणि चाळी असलेले ६६१ विभाग कंटेनमेंट झोन तसेच १११० इमारती सीलबंद म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या. २६ मे रोजी झोपडपट्टी आणि चाळी असलेले ६८६ विभाग कंटेनमेंट झोन तसेच २८२६ इमारती सील म्हणून घोषित करण्यात आल्या होत्या. काल २५ जून रोजी झोपडपट्टी आणि चाळी असलेले ७५६ विभाग कंटेनमेंट झोन तसेच ६००५ इमारती सील बंद म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. गेल्या महिनाभरात कंटेनमेंट झोन असलेल्या झोपडपट्टी आणि चाळीच्या संख्येत ७० ने तर सीलबंद इमारतीच्या संख्येत ३१७९ ने वाढ झाली आहे. यावरून इमारतींमधून झोपडपट्टी, चाळीत गेलेला कोरोना व्हायरस आता पुन्हा इमारतींमध्ये पसरू लागला आहे.
लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा - कोरोनाचा प्रसार सुरुवातीला इमारती व सोसायटीपासून सुरू झाला. नंतर तो त्या इमारतीत काम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून झोपडपट्टी आणि चाळींमध्ये पसरला. आता पुन्हा कोरोनाचा प्रसार इमारती व सोसायटीमध्ये झाला आहे. सोसायटीच्या जागेत लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याने कोरोनाचे रुग्ण इमारतींमध्ये वाढत आहेत. आपल्या सोसायटीमध्ये रहिवाशी लॉकडाऊनचे नियम पाळतात का, मास्क वापरतात का, फिजिकल डिस्टनसिंग पाळतात का याची पाहणी करून त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांमार्फत सोसायटी व इमारतींना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
सीलबंद इमारत म्हणजे काय --एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण आढळून आले असल्यास, अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला 'सीलबंद' म्हणून घोषित करण्यात येते. कोरोना बाधित रुग्ण रहात असलेल्या घराची व इमारतीची परिस्थिती लक्षात घेऊन सदर इमारत किंवा इमारतीचा काही भाग 'सीलबंद' म्हणून घोषित करण्यात येतो. अशा इमारतीच्या व्यवस्थापकीय समितीस याची माहिती देण्यात येते. सोसायटीतील इतर व्यक्तींना बाधा होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजनांबाबत माहिती व मार्गदर्शन महापालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे देण्यात येते.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी -कोरोना रुग्ण आढळून आलेल्या सीलबंद इमारतीच्याबाबत नियुक्त करण्यात आलेल्या सोसायटीच्या समितीद्वारे स्थानिक किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, मेडिकल दुकान इत्यादींशी संपर्क साधून सोसायटीच्या गरजांनुसार वस्तूंची वा सामानाची मागणी नोंदवली जावी. 'ऑर्डर' दिलेल्या सामानाची किंवा वस्तूंची 'डिलिव्हरी' ही सोसायटीच्या 'एन्ट्री गेट'वर दुकानदारांद्वारे वा विक्रेत्यांद्वारे दिली जावी. ऑर्डरनुसार सोसायटी सदस्याच्या दरवाज्यापर्यंत वस्तूची डिलिव्हरी करण्याची व्यवस्थाही सोसायटीच्या समितीद्वारे केली जावी. सोसायटीत कोरोना लक्षणे आढळून आल्यास समिती सदस्यांनी त्याची माहिती पालिकेला कळवण्याची दक्षता घ्यावी, असे आदेश मुंबई महापालिकेने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
सीलबंद / कंटेनमेंट झोन इमारतींची आकडेवारी दिनांक झोपडपट्टी/ चाळ इमारती
१७ मे ६६१ - १११०
२६ मे ६८६- २८२६
९ जून ७७५ - ४०७१
१५ जून ८२८ - ४८५९
१७ जून ८३४ - ५२०५
२४ जून ७६५ - ६११५
२५ जून ७५६ - ६००५