मुंबई - मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्यावर राणीबागेत पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मुलांच्या शाळांना सुट्टी असल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मे महिन्यात बुधवार सुट्टीचा दिवस वगळता २५ दिवसात तब्बल ३ लाख ६८ हजार ७२९ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे पालिकेला तब्बल १ कोटी ४२ लाख ६८ हजार ५८० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
पर्यटकांची गर्दी - मुंबई भायखळा येथे असलेल्या राणीबाग पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. राणिबागेत २०१७ मध्ये परदेशी पेंग्विन आणल्यावर पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्याने राणीबाग बंद होती. कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्यावर नोव्हेंबरपासून राणीबाग पुन्हा पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. पेंग्विन, वाघ, बिबट्या, अस्वल आदी प्राणी व पक्षी आणण्यात आले. त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत असल्याने उत्पन्नात मोठी वाढ होत आहे.
२५ दिवसांत १ कोटी ४२ लाख उत्पन्न - राणीच्या बागेत दररोज सरासरी १४ हजार तर रविवारी सुट्टीच्या दिवशी किमान २० ते २५ हजार पर्यटक भेट देत आहेत. त्यामुळे राणी बागेला दररोज ५ - ६ लाख रुपये तर सुट्टीच्या दिवशी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. २८ मे शनिवारी सुट्टीच्या दिवशी एका दिवसात राणी बागेला ८.३४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर २९ मे रोजी ३० हजार ३७९ पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली. त्यामुळे राणी बागेला १० लाख ८४ हजार ७४५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. १ ते २९ मे या कालावधीत (दर बुधवारी सुट्टी सोडून) २५ दिवसात तब्बल ३ लाख ६८ हजार ७२९ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे पालिकेला तब्बल १ कोटी ४२ लाख ६८ हजार ५८० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे अशी माहिती राणीबाग प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
हेही वाचा - बलात्कार प्रकरणात निरपराधांना पकडले पोलिसांच्या चौकशीचे आदेश