मुंबई - नैऋत्य मोसमी वारे सोमवारपर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेली शक्यता खरी ठरली आहे. या मान्सूनवर यास चक्रीवादळाचा चांगला परिणाम झाल्याचा दिसत आहे. हवामान विभागाने यापूर्वी मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते. मात्र अंदाजपूर्वी म्हणजेच 31 मे रोजी मान्सून केरळात दाखल होणार आहे.
नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्वेकडील भागात पोहचले आहे. मान्सून आता मालदीव, कोमोरिन या भागात सक्रिय झाला आहे. मान्सूनची हीच घोडदोड कायम राहिल्यास केरळात सोमवारी म्हणजेच 31 मे रोजी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यास चक्रीवादळामुळे मान्सून वेगाने पुढे सरकरण्यास मदत झाली आहे. त्यामुळे मान्सून एक दिवस अगोदर केरळमध्ये पोहोचेल आणि वेळेआधीच इतर भागातही मान्सून पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर सहा दिवसानंतर महाराष्ट्र दाखल होतो. 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणासह मुंबईत दाखल होईल. 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मान्सून सामान्यत: 98 टक्के राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. यावेळी देखील तौक्ते चक्रीवादळमुळे मान्सून लांबणीवर पडेल, असे वाटत होते. मात्र हवामान विभागाने दिलेल्या माहितीमुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार?
सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल. त्याप्रमाणे 9-10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.