मुंबई - इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन आणि रेल्वेच्या संयुक्त सहकार्याच्या माध्यमातून मागील २८ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या जीवनरेखा एक्स्प्रेसने आता कात टाकली आहे. ही एक्सप्रेस नव्याने ग्रामीण भागातील नागरिकांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही रेल्वे आता छत्तीसगडच्या दौऱ्यावर निघाली आहे.
हेही वाचा - गेल्या ६ वर्षात लोकलवर दगडफेकीच्या ११८ घटना; ११३ प्रवासी जखमी
जीवनरेखा एक्सप्रेसचे नवीन कोच हे माटुंगा येथील वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आले आहेत. या एक्स्प्रेसला एकूण ७ डब्बे आहेत. या रेल्वेची सुरुवात ही १७ जुलै १९९१ ला बिहारच्या खलारी जिल्ह्यातून झाली होती. नुकतेच महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात तिने ९३ हजार ११ जणांवर उपचार केले. तर आतापर्यंत देशभरात तिने १२ लाख ३२ हजार ३२ रुग्णांवर उपचार केले आहेत. यापुढे ही एक्सप्रेस झारखंड, छतीसगड, ओरिसा बिहार आणि पूर्वोत्तर राज्यात जाणार आहे. आत्तापर्यंत २०२ ठिकाणी थांबून या एक्सप्रेसने नागरिकांवर उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या आहेत. ही एक्सप्रेस ग्रामीण भागात २१ दिवसांचा मुक्काम करते.
एक्सप्रेसच्या आधुनिकीकरणाचे गुरुवारी रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक डॉ. आर. बद्ररी नारायण, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनच्या प्रमुख रमेश सरिन, आणि या फाउंडेशनच्या प्रमुख पदाधिकारी डॉ. रोहिणी चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन झाले.यावेळी डॉ. चौगुले यांनी एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रामुख्याने डोळे, कान तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, त्यानंतर बहिरेपणा आल्यास मशीन दिली जाते. पोलिओ आणि ओठावर शस्त्रक्रिया केल्या जातात, त्यासाठी तज्ज्ञ लोकांची टीम कायम या एक्सप्रेस सोबत असते, अशी माहिती दिली.
हेही वाचा - ...आणि त्याने प्रवाशाला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले, थरार सीसीटीव्हीमध्ये कैद!
मागील दोन वर्षांपासून यात कॅन्सरची तपासणी केली जात आहे. त्यासाठी देशातील टाटा आणि इतर रुग्णालयासोबत समन्वय साधून त्यासाठी उपचार मिळेल, अशी सोय केली जात आहे. या उपक्रमाला देशभरात मोठा प्रतिसाद मिळत असून ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठा लाभ मिळाला आहे. अपंगत्वापासून बचाव करणे तसेच महिलांच्या कॅन्सरवरील उपचारासंबंधी या एक्सप्रेसने काम सुरू केले आहे, अशी माहितीही चौगुले यांनी दिली.